राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा


22nd June 2018, 01:20 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : खाण सुरक्षा महासंचालनालयाने केलेल्या पाहणीत राज्यातील सर्व खाण लीज क्षेत्रातील खाण खंदक सुरक्षित असल्याचा अहवाल सरकारला सादर केला आहे. मागील लीज धारकांनी खाण सुरक्षेच्या संदर्भात योग्य ती काळजी घेतली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.       

खाण सचिव दौलत हवालदार यांनी खाण सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी १९ जून रोजी बैठक बोलावली होती. या बैठकीत खाण सुरक्षा महासंचालनालयाने सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली. खाण सुरक्षा महासंचालनालयाने ६ आणि १३ जून रोजी राज्यातील सर्व खाण खंदकांची पाहणी केली होती. भारतीय खाण ब्युरोच्या विभागीय नियंत्रकांनीही खाण सुरक्षेबाबत समाधान व्यक्त केले.       

दरम्यान, मागील काळात १५ मार्च २०१८ पर्यंत हाताळण्यात आलेल्या डंपच्या स्थितीवरही या बैठकीत उहापोह करण्यात आला. मान्सूनपूर्व आणि आता नियमित पावसामुळे हे डंप स्थिरावले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जलस्रोत खात्याकडून स्वतंत्रपणे खाण खंदकांची पाहणी केली जाते. खंदकातील पाण्याचा साठा, पाणी वाहून जाण्याचा मार्ग, तसेच पाण्याच्या प्रवाहातील अडथळ्यांवर उपाय केले जातात. दरम्यान, मान्सूनच्या या काळात धोकादायक ठरू शकणाऱ्या खाण खंदकांचे वेगळे सर्वेक्षण करून त्यासंबंधी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना खात्याचे प्रधान मुख्य अभियंत्यांनी केली.       

२६ आणि ३० रोजी पुन्हा सर्वेक्षण

या बैठकीला मागील लीज धारकांचे प्रतिनिधी हजर होते. त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेण्यात आली. सर्व खाण खंदकांच्या परिसरात कामगार तैनात करण्यात आले आहेत. आपत्कालीन प्रसंगी उपयोगी येणारी मशिनरी सज्ज ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. खाण सुरक्षा महासंचालनालयाला सर्वेक्षणासाठी वाहन पुरविण्याची मागणी खाण संचालाकांनी या बैठकीत मंजूर केली. २६ आणि ३० जून रोजी पुन्हा एकदा नव्याने राज्यातील सर्व खाणींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.