आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.


22nd June 2018, 01:20 am

प्रतिनिधी : गोवन वार्ता      

पणजी : आराडी-बांध पठारावरील सुमारे २० घरांचे नळ पावसाळ्यात कोरडे पडले आहेत. पाणी विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. याठिकाणी बसविलेल्या पंपाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.       

आराडी-बांध पठारावर नेहमीच पिण्याच्या पाण्याचा त्रास जाणवत असल्याने याठिकाणी विशेष पंप बसविला आहे. हा पंप केवळ आराडी-बांध पठारावरील लोकांना पाणी पुरवठ्यासाठी असेल, असेही बांधकाम खात्याने आदेशात स्पष्ट केले आहे. तरीही अधिकारी या पंपाच्या आधारे अन्य लोकांना नळ जोडण्या देत आहेत. ताळगाव परिसरातही या पंपाद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्याची गती मंदावली आहे. त्यातून पठारावर पाणी चढत नसल्याने आराडी-बांध रहिवाशांची गौरसोय झाली आहे.       

दरम्यान, आराडी-बांध येथे पठारावर चढण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. एरवी उन्हाळ्यात पायऱ्यांवर चढून पाणी न्यावे लागत होते. आता पावसामुळे हे शक्य होत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांच्याकडे याविषयी अनेकदा चर्चा करूनही आणि त्यांच्याकडून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊनही ही परिस्थिती सुधारत नसल्याने लोकांचा रोष बराच वाढला आहे. आता भर पावसाळ्यात पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.