प्रशासनाच्या हलगर्जीमुळे म्हापसा तुंबले

पाणीच पाणी चहुकडे, गेला रस्ता कुणीकडे : घरांत, दुकानांत पाणी


22nd June 2018, 01:18 am
प्रशासनाच्या हलगर्जीमुळे म्हापसा तुंबले

प्रतिनिधी । गोवन वार्ता       

म्हापसा : येथील चाचा नेहरू उद्यानासमोरील दुभाजक, खोर्लीतील मुख्य नाल्याचे अरुंद बांधकाम, तार नदीच्या प्रवाहाला ठरलेला अडथळा, नदीला आलेली भरती व पाण्याच्या निचऱ्यासंबंधी सरकारी यंत्रणांनी केलेली हलगर्जी या कारणामुंळे बुधवारी म्हापशात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले, असा निष्कर्ष पालिकेने काढला आहे.       

मुसळधार पावसामुळे बुधवारी शहरात पूरस्थिती निर्माण झाली. खोर्लीतील उसापकर जंक्शन आमुली व भटवाडी येथे पाणी साचून रामा गोवेकर, सुंदर मालवणकर, रूपेश हडफडकर, नंदकिशोर शिरगावकर, हरिश्चंद्र कांदोळकर, हमराज आमोणकर, विजय आगारिया, राजेश बर्डे, औदुंबर कारेकर, रमेश आरोलकर, श्यामसुंदर कारेकर, शैलेश मिस्कीन, प्रकाश जल्मी, अॅन्थनी कार्दोज, प्रभाकर पेडणेकर, गुरुदास विर्नोडकर, अजित वाययंगणकर, उमेश पेडणेकर, कीर्ती नागवेकर, सुहास पडवळ, योगेश पेडणेकर, संदेश नागवेकर व महेश नागवेकर यांच्या घरात, तर दिगंबर शिंदे यांचे दुकान व अभिनारायण सॉ मिलमध्ये व परिसरात पाणी घुसले. यामुळे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.       

चाचा नेहरू उद्यानासमोरील रस्त्याच्या दुभाजकामुळे एका बाजूचे पाणी अडून राहिले. तसेच रस्त्याच्या बाजुला बांधल्या बंद गटाराचे छिद्र (होल) उंच असल्याने त्यातून निचरा झाला नाही. मलनिस्सारण वाहिन्याच्या चेंबर्समधूनही मोठा लोट आला. त्यामुळे नाटेकर फार्मसी समोर पूरस्थिती निर्माण झाली.      

तार नदीवर महामार्ग रुंदीकरणासाठी जोड पूल बांधला आहे. बांधकामासाठीची माती आणि इतर साहित्य कंत्राटदाराने काढलेले नाही. त्यामुळे मार्केट भागात पाणी साचले. पाणी दुकानांत शिरल्यामुळे नुकसान झाले. बिलवान पेडे येथे गजानन कार वॉशिंग सेंटर परिसरातही पाणी घुसून नुकसान झाले. मरड व खोर्ली बार्देश बाजारमध्ये पाणी घुसून हानी झाली.

पालिकेचे जलस्रोत खात्याकडे बोट

म्हापसा पालिका अधिकाऱ्यांनी या पूरस्थितीचे खापर जलस्रोत खात्यावर फोडले आहे. जलस्त्रोत खात्याने नाल्याचे बांधकाम अरुंद करण्याबरोबरच साफसफाईचे कामही व्यवस्थित केले नसल्याचा ठपका ठेवून तसा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल पालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती पालिका सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रतिक्रिया

श्रीपाद सावंत, पदाधिकारी, व्यापारी संघटना : बाजारातील निच‌ऱ्याबाबत संघटनेने नगराध्यक्ष व पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. मार्केटच्या मागील नाल्याचे बांधकाम करण्यापेक्षा तार नदीतील गाळ उपसा करण्याबरोबरच नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या गोष्टींवर उपाययोजना करा, अशी सूचना केली होती. जलस्रोतमंत्र्यांनाही याची जाणीव करून देण्यात आली होती. यंदा बाजारात पाणी साचणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात ते आश्वासन पावसाने निष्फळ ठरविले. 

बाबुन कानोळकर : महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे यंदा बिलवान-पेडे येथेही पूर आला व नुकसान झाले.

अॅड. महेश राणे : खोर्लीमध्ये पूर येणे ही पावसाळ्यातील नित्याची गोष्ट आहे. तरीही पालिका मंडळ व पालिका अधिकारी जागृत होत नाहीत. मे महिन्यामध्ये गटारांची साफसफाईची निविदा काढली जाते. मुख्य नाल्याच्या खाली काँक्रीट घालण्यात आले, त्याचा हा परिणाम आहे. 

नगरसेवक तुषार टोपले- दत्तवाडी व हाऊसिंग बोर्ड डोंगरावरील पाण्याचा संगम चाचा नेहरू पार्क उद्याना समोर होतो आणि त्यामुळे या सकल भागात पाणी साचते.

सुदेश हसोटीकर, व्यापारी : रात्रीच्या वेळी काही व्यापारी कचरा गटारांत फेकतात. प्लास्टिकचा कचरा गटारात अडकतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येतो.

गेल्यावर्षी पालिकेच्या आग्रहास्तव जलस्रोतचे मुख्य अभियंता नाडकर्णी यांनी नाल्याची पाहणी करून पाणी झिरपण्यासाठी उपाययोजना केली होती. नाला पूर्ण करताना कंत्राटदाराने पुन्हा तशी व्यवस्था केली नाही. पूरस्थिती टाळण्यासाठी उसापकर जंक्शनवर पर्यायी नाला आवश्यक आहे.
—रोहन कवळेकर, नगरसेवक
मार्केटमधील पाणी साचण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी संघटनेने प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना ही समस्या सोडविण्याची इच्छाच नाही. त्यामुळे दरवर्षी मार्केटमध्ये अशीच स्थिती असते.
—आशिश कार्दोज, सचिव, म्हापसा व्यापारी संघटना
जलस्रोत खाते व मलनिस्सारण वाहिन्या टाकणाऱ्या जायका कंपनीकडून नियोजन झाले नाही. मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये असलेल्या गळतीमुळे त्यात पाणी घुसले व ते चेंबर्समधून बाहेर पडत आहे. अशी पूरस्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी. 
—गुरुदास वायंगणकर, माजी नगरसेवक
जोरदार पावसाच्या पाण्याचा लोट घाटेश्वर व खोर्ली टेकडीवरून उसापकर जंक्शनवरील नाल्यात एकत्र झाला. त्यामुळे नाला तुंबला आणि भागात पाणी साचले. जलस्रोत खात्याने सातेरी मंदिराच्या मागील नाला अरुंद केला. तसेच नाल्याच्या खाली काँक्रीट पीसीसी स्लॅब घातल्याने पाण्याच्या प्रवाहाची क्षमता वाढली. त्यामुळेच या भागात भयानक स्थिती झाली. 
—राजसिंह राणे, नगरसेवक