खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा


22nd June 2018, 03:16 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी बोलाविलेल्या खाणप्रश्नासंदर्भातील बैठकीला सावर्डेचे आमदार दीपक प्रभुपावसकर वगळता अन्य कुणीही उपस्थित राहिले नाही. त्यामुळे खाण अवलंबितांची घोर निराशा झाली. खाण पट्ट्यातील बहुतांशी आमदार परराज्यांत असल्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. हे आमदार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहेत.

अमेरिकेतून गोव्यात परतल्यापासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणप्रश्नावर नेमका कसा तोडगा काढावा, याबाबत अभ्यास सुरू केला आहे. यासंदर्भात गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांनी पर्वरी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. पण या बैठकीला केवळ सावर्डेचे आमदार दीपक प्रभुपावसकर हे एकटेच उपस्थित राहिले. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे परराज्यात असल्यामुळे तसेच विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर अन्य एका कामात व्यस्त राहिल्याने बैठकीला हजर राहू शकले नाहीत. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी बहुतांशी आमदार पूर्वनियोजित कार्यक्रमांत व्यस्त राहिल्याने ते बैठकीला हजर राहू शकले नाहीत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.

खाण अवलंबित आमदारांत एकमताचा अभाव

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या या बैठकीकडे खाण अवलंबितांचे लक्ष लागून राहिले होते. बैठकीतून काहीतरी तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी बाळगली होती. पण ही बैठकच लांबणीवर पडल्याने त्यांच्यात पुन्हा निराशा पसरली आहे. खाण अवलंबित आमदारांत या प्रश्नी एकमत नाही. त्यामुळेच सरकारी पातळीवर अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही, अशी नाराजी खाण अवलंबितांच्या एका नेत्याने ‘गोवन वार्ता’शी बोलताना व्यक्त केली.

पर्रीकर घेणार पंतप्रधानांची भेट

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन खाणप्रश्नी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकटेच हजर राहणार आहेत. राज्यातील इतर विषयांबाबतही पर्रीकर पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.