चार हजार डीएड, बीएड पदविकाधारक नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत


22nd June 2018, 03:15 am

- राज्यात नोकऱ्या अल्प, पदविकाधारक जास्त

- बीएड पदविकाधारकांसाठी लवकर भरती नाही

- शिक्षणक्षेत्रातील स्थितीचा विद्यार्थ्यांनाही फटका

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : दरवर्षी सुमारे तीनशे डीएड व बीएड पदविकाधारक शिकून बाहेर येतात, पण राज्यात त्यांना नोकरीच्या संधी मात्र अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असतात. सध्या राज्यातील सुमारे चार हजार बीएड, डीएड, एमएड व बीपीएड पदविकाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षी दोनशेच्या आसपास सरकारी शिक्षक निवृत्त होत असले, तरी त्यांच्या जागी नवी पदे निर्माण होतातच असे नाही. खासगी क्षेत्रातही तीच स्थिती आहे. खासगी शाळांमध्ये नोकऱ्या उपलब्ध असल्या, तरी त्यातील बहुतांशी नोकऱ्या कंत्राटी तत्त्वावर असतात किंवा रजेवर गेलेल्या शिक्षकाच्या जागी काही महिन्यांसाठी नोकऱ्या मिळतात. फेब्रुवारी २०१८ पर्यंत राज्यातील रोजगार विनिमय केंद्रात ६६४ डीएड, २,४६५ बीएड, २९० बीपीएड आणि २२ एमएड पदविकाधारकांची नोंद होती. यावर्षी सुमारे ६०० जणांची त्यात भर पडली असून, त्यांची नोंदणी सध्या सुरू आहे. त्यामुळे हा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे. रोजगार विनिमय केंद्राकडे उपलब्ध असलेल्या गेल्या पाच वर्षांत नोकरी मिळालेल्यांत ५७ डीएड पदविकाधारक, २३५ बीएड धारक, २७ एमएड धारक आणि ५२ बीपीएड पदविकाधारक उमेदवारांचा समावेश आहे. म्हणजे पाच वर्षांत केवळ ३७१ जणांनाच नोकरी मिळाली, असे यावरून स्पष्ट होते.

डीएड पदविकाधारकांसाठी पात्र म्हणून ज्या नोकऱ्या येतात, त्यासाठी बीएड पदविकाधारक अर्ज करू शकतात. त्यामुळे प्राथमिक स्तरावर आलेल्या नोकऱ्यांसाठी बीएड पदविकाधारकांना अवलंबून रहावे लागते, ही सत्यस्थिती आहे. पण राज्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमधून बीएड व डीएड पदविकाधारक तयार करण्याचे काम सुरूच आहे.

१२२ प्राथमिक शिक्षकांची पदे भरणार

शिक्षण खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सुमारे १२२ शिक्षकांची पदे भरण्यासाठी जाहिरात निघणार आहे. ही पदे डीएड पदविकाधारकांसाठी असली, तरी बीएड पदविकाधारकांनाही त्यासाठी अर्ज करता येतील. ही पदे सोडली तर सध्या सरकारी स्तरावरही शिक्षकांची पदे भरण्याची स्थिती नाही. शाळांमध्ये अनेक पदे रिकामी असली, तरी विद्यार्थी-शिक्षक प्रमाण पाहता सध्या सरकारी स्तरावर परिस्थिती जुळवून घेतली जात आहे.

सरकारी शिक्षण संस्थांमध्ये बीएड पदविकाधारकांसाठी नोकरीची जागाच उपलब्ध नाही. ज्या जागा आहेत, त्या बढती पद्धतीने भरल्या जातात. त्यामुळे बीएड पदविकाधारकांसाठी थेट भरती नजिकच्या काळात होणार नाही, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली.

शिक्षणतज्ञ डॉ. संजय देसाई म्हणतात...

- प्राथमिक शिक्षणाचे क्षेत्र विकसित करण्याच्या हेतूने शिक्षण खात्याने काम करण्याची आवश्यकता आहे. सध्या विद्यार्थी-शिक्षक प्रमाण १:२६ असे आहे, त्यात बदल करून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असतील, तर एकाचवेळी चारही वर्गात चार शिक्षक असणे आवश्यक आहे. एकच शिक्षक चारही वर्गांना शिकवत असेल, तर विद्यार्थ्यांचा विकास कसा काय होऊ शकतो?

- सध्या गोव्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात जसे झपाट्याने बदल होत आहेत, तसेच प्राथमिक स्तरावरही होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या संदर्भात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक तेवढी शिक्षक भरती करण्यावर भर दिला पाहिजे.

- विद्यार्थी-शिक्षक प्रमाणाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जात आहे. येथे तेवढे विद्यार्थी म्हणजे अमुक शिक्षक असा अन्वयार्थ लावला जातो. मुळात प्रत्येक इयत्तेसाठी एक शिक्षक असणे अपेक्षित आहे.