केळेकर, कोलवाळकर, जोशींना भाषा पुरस्कार


22nd June 2018, 03:14 am
केळेकर, कोलवाळकर, जोशींना भाषा पुरस्कार

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राजभाषा संचालनालयाने वार्षिक भाषा पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गुरुनाथ केळेकर यांना कोकणीसाठी, रमेशचंद्र कोलवाळकर यांना मराठीसाठी, तर गोपाळ जोशी यांना संस्कृत भाषेच्या सेवेसाठी २०१६-१७ सालासाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

रोख एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. राजभाषा संचालक स्नेहा मोरजकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले असून, एका विशेष समारंभात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ज्ञानपीठकार रविंद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार गुरुनाथ शिवाजी केळेकर यांना, बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार रमेशचंद्र केशरीनाथ कोलवाळकर यांना, तर दुर्गाराम उपाध्ये संस्कृत भाषा पुरस्कार गोपाळ शिवराम जोशी यांना जाहीर झाला आहे. भाषेची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यासाठी काही वर्षांपूर्वी भाषा पुरस्कार योजना सुरू केली होती. याआधी नारायण मावजो, अवधूत कुडतरकर, सदाशिव टेंगसे, विनायक मोडक, रमाकांत पायाजी, फा. जायम कुटो आदींना हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.