उरुग्वेची सौदी अरबवर मात

सुआरेजचा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला अविस्मरणीय


21st June 2018, 01:41 am

रोस्तोव ऑन डॉन : स्टार खेळाडू लुईस सुआरेजनने निर्णायक गोल करून उरुग्वेने सौदी अरबवर १-० ने विजय मिळवला. सुआरेजचा हा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. गटातील सलग दुसरा विजय नोंदवून उरुग्वेने अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित करण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. उरुग्वेचे दोन सामन्यात ६ गुण झाले आहेत. ‘ए’ गटात यजमान रशियाचेही सहा गुण आहेत; परंतु गोल अंतर सर्वोत्कृष्ट असल्यामुळे उरुग्वे गुणतक्त्यात अग्रस्थानी आहे. उरुग्वेने सलामीला इजिप्तला १-० ने पराभूत केले होते. १९५४ नंतर प्रथमच उरुग्वेने विश्वचषकात गटातील सामन्यांत सलग दोन विजय संपादन केले आहेत.
खेळाच्या २३ व्या मिनिटाला सुआरेजने हेडरद्वारे गोल करून उरुग्वेचे खाते उघडले. २८ व्या मिनिटाला सौदी अरबला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती; परंतु हाल्टन बाहेबरी याला फायदा घेता आला नाही. हाफटाईमपर्यंत उरुग्वेने १-० अशी आघाडी घेतली होती.
दुस‌ऱ्या हाफमध्ये फ्री-किकद्वारे सुआरेजला दुसरा गोल डागण्याची उत्तम संधी मिळाली होती; परंतु सौदी गोलकीपरच्या सुंदर बचावामुळे गोल होऊ शकला नाही. उरुग्वेची बचावफळी एखाद्या भिंतीप्रमाणे कार्यरत दिसली. त्यांनी सौदी अरबच्या खेळाडूंचे फटके गोलपोस्टपर्यंत पोहोचूच दिले नाहीत. सौदी अरबला गोल करता न आल्यामुळे हा सामना उरुग्वेने १-० ने आपल्या नावावर केला.

लुईस सुआरेजचा हा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने २००७ मध्ये कोलंबिया विरुद्धच्या सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. विश्वचषकांत उरुग्वेकडून सर्वाधिक गोल करणा‌ऱ्यांमध्ये तो आता तिस‌ऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात नोंदवलेला गोल विश्वचषकातील त्याचा सहावा गोल आहे. प्रथम स्थानी आठ गोलांसह ऑस्कर मिग्युसे आहेत.