रशियाची विजयी घोडदौड सुरूच

इजिप्तवर ३-१ ने मात; यजमान नॉकआऊटच्या उंबरठ्यावर


21st June 2018, 01:40 am

सेंट पिट्सबर्ग : यजमान रशियाने ‘ए’ गटातील आपल्या दुस‌ऱ्या सामन्यात इजिप्तचा ३-१ ने पराभव केला. मंगळवारी रात्री खेळवण्यात आलेल्या या सामन्यात विजय मिळवून रशिया नॉकआऊटच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. सलग दोन पराभवामुळे इजिप्तची विश्वचषकातील पुढील वाटचाल मात्र आता कठीण बनली आहे.

जखमी असल्यामुळे इजिप्तचा स्टार स्ट्राइकर मोहम्मद सलाह खूप दिवस खेळू शकला नव्हता. या सामन्याद्वारे त्याने पुनरागमन केले व पेनल्टीद्वारे गोलही डागला; मात्र तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. ४७ व्या मिनिटाला इजिप्तचा कर्णधार अहमद फातही याने स्वयंगोल करून रशियाला आघाडी मिळवून दिली. हा या विश्वचषकातील पाचवा स्वयंगोल ठरला. त्यानंतर डेनिस चेरिशेव आणि आर्तियोम ज्युबा यांनी पाठोपाठ गोल डागून ही आघाडी ३-० अशी केली. चेरिशेवचा हा या विश्वचषकातील तिसरा गोल आहे. आता तो सर्वाधिक गोल करणा‌ऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डोसह पहिल्या स्थानावर आहे. इजिप्तकडून सलाहने ७३ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. हा गोल इजिप्तसाठी २८ वर्षातील विश्वचषकामधील पहिला गोल ठरला.

तत्पूर्वी विलारीयालचा विंगर चेरिशेवने ५९ व्या मिनिटात मारियो फर्नांडिसच्या क्रॉसवर गोल करून रशियाला बढत मिळवून दिली. त्यानंतर तीन मिनिटांतच ज्युबाने चेंडू छातीवर घेऊन अली अकबरला चकवा देत तिसरा गोल केला. इजिप्तचा कर्णधार अहमत फातही याच्या स्वयंगोलने रशियाचे खाते उघडले. रोमन जोबनिनचा पास अडवण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू त्याच्या गुडघ्याला लागून गोलकीपर मोहम्मद ई याला चकवत गोलपोस्टमध्ये गेला. पहिल्या हाफटाईम वेळी दोन्ही संघांकडून एकही गोल डागण्यात आला नव्हता.