ऑस्ट्रेलियाला विजय महत्त्वाचा

आत्मविश्वास दुणावलेल्या डेन्मार्कचे आव्हान


21st June 2018, 01:40 am

कजान : गट ‘सी’ मधील ऑस्ट्रेलिया गुरुवारी डेन्मार्क विरोधात खेळणार आहे. या सामन्यात विजय प्राप्त करून  पुढील फेरीत जाण्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न असतील. त्यांच्या या प्रयत्नात प्रतिस्पर्धी संघातील क्रिस्टियन एरिकसन हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. या गटात सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला फ्रान्सकडून १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी डेन्मार्कविरोधातील सामना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.

टोटेनहम होत्सपूरचा मिडफिल्डर एरिकसनने पात्रता फेरीत ११ गोल केले आहेत. फ्रान्सविरोधातील सामन्यात सुंदर खेळाचे प्रदर्शन केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीवर समर्थकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. या कौतुकातून बाहेर पडून हे खेळाडू डेन्मार्क विरोधातील सामन्यातही उत्कृष्ट खेळ सादर करतील, असा विश्वास संघाचे प्रशिक्षक बर्ट वान मारविक यांनी व्यक्त केला आहे. 

सलामीच्या सामन्यात पेरूवर १-० ने विजय संपादन केलेल्या डेन्मार्क संघाचा आत्मविश्वासही दुणावलेला आहे. त्यांचा गोलकीपर कॅस्पर शेमईचेलने चपळाईने अनेक फटके रोखण्यात यश मिळवले होते. ठरलेल्या रणनीतीनुसारच संघातील खेळाडू खेळ सादर करतील. शेमईचेल मँचेस्टर युनायटेडचा महान गोलकीपर पीटर यांचा पुत्र कॅस्पर ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्याने यापूर्वीच आपल्या पित्याचा विक्रम मोडला आहे. त्याने सलग ५३४ मिनिटे प्रतिस्पर्ध्याला गोल करू न दिलेला नाही. त्याच्या पित्याच्या नावावर ४७० मिनिटांचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेंट सेन्सबरीनेही फ्रान्स विरोधातील सामन्यात आपल्या उत्कृष्ट खेळाने प्रभावित केले होते. जियांगसु सुनिंगचा हा २६ वर्षीय खेळाडू म्हणतो, यापूर्वीच्या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे; मात्र आम्हीही आमच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करू.