दुस‌ऱ्या विजयासाठी फ्रान्स उत्सुक

नॉकआऊट प्रवेशासाठी पेरूकरिता ‘कराे या मरो’


21st June 2018, 01:39 am

एकातेरिनबर्ग : सलामीच्या सामन्यातील बलाढ्य संघांच्या खराब प्रदर्शनानंतर गुरुवारी येथे होणा‌ऱ्या फ्रान्स आणि पेरू यांच्यातील सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. गट ‘सी’ मधील या सामन्यात आक्रमक खेळ सादर करून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवण्यासाठी फ्रान्सचा प्रयत्न राहील. या सामन्यात बलाढ्य फ्रान्सकडे विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. या संघाने प्रारंभीच्या सामन्यात मात्र डेन्मार्ककडून पराभव स्वीकारला आहे. जर्मनीला मेक्सिकोकडून हार पत्करावी लागली असून स्पेन, अर्जेंटिना आणि ब्राझिल यांचे सलामीचे सामने अनिर्णित राहिले आहेत. पेरूवर विजय संपादन करून पुढील फेरीत पोहोचण्याची फ्रान्सकडे उत्तम संधी आहे. 

सलामीच्या सामन्यात फ्रान्सचे आघाडीचे तीन खेळाडू चांगला खेळ करू शकले नाहीत. ग्रीजमान, केलियान एमबाप्पे आणि ओऊस्माने डेम्बेले यांच्याकडून संघाला उत्कृष्ट प्रदर्शनाची आशा आहे. रियल माद्रिदचा बचावपटू राफेल वरानेने मागील सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीचे अवलोकन करण्यात आल्याचे सांगितले. अन्य बलाढ्य संघांनी आपला सलामीचा सामना ड्रॉ केला. आम्ही मात्र विजय संपादन केला होता. तरीदेखील आमच्या खेळात काही गोष्टींत सुधारणा होणे आवश्यक आहे.

पेरूच्या संघाचे समर्थक मोठ्या संख्येने येथे पोहोचले आहेत. डेन्मार्क विरोधात पेरूच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले होते; परंतु गोल करण्याच्या अनेक संधी त्यांनी गमावल्या. परिणामी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आणखी एक पराभव पेरूचे नॉकआऊटमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंग करू शकतो. १९८२ नंतर हा संघ प्रथमच विश्वचषक खेळत आहे. ३४ वर्षीय स्ट्राइकर पाओलो गुरेरो डेन्मार्क विरोधातील सामन्यात शेवटची ३० मिनिटे शिल्लक असताना मैदानात उतरला होता. पेरू विरोधातील सामन्यात तो खेळाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.