‘दीनदयाळ स्वास्थ्य’मधून विमा कंपनी बाहेर

पॅरामाऊंट हेल्थ ग्रुपला देणार काम

14th June 2018, 01:44 Hrs

पांडुरंग गांवकर

गोवन वार्ता      

पणजी : दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेचे काम पाहण्यासाठी विमा कंपनीला सेवा न देता सध्या योजनेचे काम पाहणाऱ्या पॅरामाऊन्ट हेल्थ ग्रुपला हे काम देण्यात येईल. त्यासाठी सरकारचे एकमत झाले असून लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होईल. सध्या नॅशनल इन्श्युरन्स ही विमा कंपनी दीनदयाळचे काम पाहते. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली, तर यापुढे विमा कंपनी आणि सरकार यांच्यात तिसरा पक्ष म्हणून काम पाहणारी पॅरामाऊंट ही कंपनी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना हाताळणार आहे.

विमा कंपनीला कोट्यवधी रुपये द्यावे लागतात. योजनेच्या समन्वयाचे काम पाहणाऱ्या कंपनीला हे काम देऊन किती खर्च येतो, ते पाहिले जाईल. वर्षभरात सरकारला सध्याच्या खर्चाच्या तुलनेत फायदा होत असेल, तर अशा कंपनीला योजना संभाळण्याचे काम पुढेही दिले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.      

सध्या विमा कंपनीला दिलेला पैसा व विम्याच्या दाव्यांवर झालेला खर्च यात कोट्यवधी रुपयांची तफावत आढळते. त्यामुळे विमा कंपनीवर खर्च करण्यापेक्षा ज्या पद्धतीने मेडिक्लेमची अंमलबजावणी होते, त्याच पद्धतीने या योजनेचे कामही संभाळले जाऊ शकते. जे क्लेम योजेनेतून येतील त्याचे प्रस्ताव सरकार निकालात काढेल. सरकारी निधीचा गैरवापर होऊ नये आणि राजकीय वशिल्याने प्रस्ताव येऊ नयेत म्हणून सरकार मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.