पेडणे तालुक्याला जुगाराचा विळखा

पोलिसांची मुजोरी, तक्रारींकडे दुर्लक्ष


14th June 2018, 01:43 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी :  पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जुगारी अड्डे सुरू झाले असून जुगाराने तालुक्याला विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या बेकायदा व्यवहारात राजकीय नेत्यांचे खास कार्यकर्ते सहभागी असून पोलिसांचे त्यांना पूर्ण सरंक्षण प्राप्त असल्याने नागरिकांच्या तक्रारींकडे उघडपणे दुर्लक्ष केले जात आहे.             

हरमल येथे मंगळवारी घडलेले अपहरण नाट्य हे अशाच पद्धतीच्या जुगाराच्या कारणांमुळेच घडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या पाठबळामुळे या बेकायदा धंद्यांत सहभागी असलेल्या लोकांची दादागिरी सुरू असून तक्रार करण्यासाठी पुढे सरसावलेल्या नागरिकांना थेट लक्ष्य केले जात असल्याची माहितीही मिळाली आहे. या जुगाराला मोठ्या प्रमाणात लोक बळी पडत आहेत. विशेष करून जुगारी अड्ड्यांवरील युवकांची गर्दी हा चिंतेचा विषय आहे. जुगाराच्या अनुषंगाने व्यसनाधीनता आणि वेश्या व्यवसायालाही प्रोत्साहन मिळत असल्याने तालुक्यातील सामाजिक जीवन या प्रकारांमुळे दूषित बनत असल्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.             

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मनोहर पर्रीकर हे वैद्यकीय उपचारांसाठी गेले तीन महिने अमेरिकेत आहेत. गृहमंत्र्यांच्या गैरहजेरीत पोलिस खात्यावर कुणाचाच वचक राहिला नसल्याने उघडपणे गैरप्रकारांना पोलिस सरंक्षण मिळत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. पेडणे तालुक्यातील विविध भागांत अशा पद्धतीच्या जुगार अड्ड्यांची केंद्रे फोफावली आहेत. अगदी स्थानिक पातळीवरील पंचायत सदस्य यांच्यासह स्थानिक पोलिस स्थानक ते पणजी मुख्यालयापर्यंत या बेकायदा उद्योगांचे लागेबांधे पोहोचले आहेत. या जुगारी अड्ड्यांतून लाखो रुपयांची उलाढाल होते आणि दर महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते पोहोचवले जातात, असेही याठिकाणी उघडपणे बोलले जाते. सर्वच राजकीय पक्षांचे लोक या गैरप्रकारांत सामील असल्याने राजकीय स्तरावर कुणीही याला विरोध करत नाही. अगदी तक्रारदारांना धमक्या देण्यापर्यंत या लोकांची मजल गेली असून त्यामुळे या लोकांशी पंगा घेण्याचे धाडस कुणीही करत नाही, असेही कळते.            

विशेष करून दर आठवड्याच्या शुक्रवारी या जुगार अड्ड्यांवर जणू जत्राच भरते. शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक जुगार खेळण्यासाठी येतात. त्यांच्या खाण्यापिण्याची आणि मद्यपानाची सोय याच ठिकाणी केली जाते. या अड्ड्यांमुळे मद्यालये तसेच हॉटेलांना गिऱ्हाईक मिळत असल्याने त्यांचाही या प्रकारांना छुपा पाठींबा मिळू लागला आहे. शुक्रवारी रात्री सुरू होणारे हे प्रकार सोमवार पहाटेपर्यंत चालतात आणि अशा जुगारी अड्ड्यांवर येणाऱ्या लोकांच्या वाहनांची गर्दी याठिकाणी होत असते.

पोलिस बेफिकीर 

या जुगारी अड्ड्यांबाबत पोलिसांत फोनवरून तक्रार केल्यानंतर पोलिस अधिकारी त्यांना सावध करतात. पोलिस आपल्या पद्धतीने घटनास्थळी भेट देतात; परंतु तोपर्यंत काही वेळापुरते हे प्रकार बंद ठेवून या तक्रारी खोट्या असल्याचे भासवले जाते. पोलिस गेल्यानंतर पुन्हा हे प्रकार सुरू होतात. पोलिस नियंत्रण कक्षावरील १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. या जुगारवाल्यांची टोळीच कार्यरत आहे. त्यांना प्रतिस्पर्धी ठरणाऱ्या अड्ड्यांवर पोलिस कारवाई करण्याचा आभास निर्माण केला जातो, असेही येथील नागरिक सांगतात.  

आमदारांचा विरोध, मंत्र्यांचे मौन 

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्याकडून या जुगाराविरोधात आवाज उठवला जात असला तरी पेडणेचे आमदार तथा क्रीडामंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांच्याकडून मात्र जुगाराबाबत मौन धारण केले जात असल्याने येथील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. सर्वच राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते या जुगारात सामील असल्याने या बेकायदा प्रकारांना पूर्णपणे राजकीय वरदहस्त प्राप्त झाला आहे. त्यातूनच पोलिसांनी या जुगारवाल्यांशी लागेबांधे प्रस्थापित रून आपले हात आेले करण्याचा सपाटाच सुरू केला आहे.