निओनेटल अॅम्ब्युलन्सद्वारे अर्भकाला जीवदान

व्हेंटिलेटरसाठी गोमेकॉ ते म्हापसा सुखरूप प्रवास

14th June 2018, 01:41 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या सेवेत असलेल्या अद्यायावत स्वरूपातील निओनेटल रुग्णवाहिकेमुळे अर्भकाला (नवजात बालकाला) गोमेकॉमधून म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात सुरक्षितरीत्या स्थलांतरीत करणे शक्य झाले. नवजात बालकावर तेथे अावश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून ते सुखरूप आहे.                   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गोमेकॉमध्ये एका महिलेने बालकाला जन्म दिला. त्यानंतर त्याला बर्थ अक्सेसिया सिव्हियर रेस्पिरेटरी डिस्ट्रस्टची लक्षणे म्हणजेच श्वसनाचा त्रास जाणवू लागला. गोमेकॉ इस्पितळात असलेले पाचही व्हेंटिलेटर कार्यरत होते. त्यामुळे त्या नवजात बालकाला तत्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे शक्य नव्हते. त्यासाठीची आवश्यक सुविधा म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात उपलब्ध असल्याने त्याला निओनेटल रुग्णवाहिकेद्वारे म्हापशाला हालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काही वेळातच त्या बालकाला म्हापसा येथील खासगी इस्पितळात सुखरूपपणे हलविण्यात आले.     

निओनेटल अॅम्ब्युलन्स काय आहे ?

जर्मन बनावटीची आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेली ही अद्ययावत स्वरूपाची अशी ही रुग्णवाहिका आहे. यामध्ये चोवीस तास डॉक्टर, तंत्रज्ञ, तसेच अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा समावेश असतो. रुग्णवाहिकेतील तंत्रज्ञांनी हैदराबाद येथे गुंतागुंतीच्या काळात कशा प्रकारे रुग्णांची हाताळणी करावी, याविषयीचे वैद्यकीय ज्ञान देणारा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यामुळे रुग्णाला हाताळणे त्यांना सहज शक्य होते.