पणजीत ४५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १८० कोटींचा खर्च

‘ईडीसी’चे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची माहिती


26th May 2018, 03:15 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत राजधानी पणजीत शहरात गोवा इंटेलिजन्ट सिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने संपूर्ण शहरात सुमारे १८० कोटी रुपये खर्चून ४५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, अशी माहिती गोवा आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पाटो ते रायबंदरपर्यंत भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येतील तसेच शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २७ एमएलडी क्षमतेचा नवीन ओपा प्लांट सुरू करण्यात येईल. त्यामुळे शहरातील रहिवाशांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. त्यासाठी सुमारे १८० कोटी रुपये खर्च केला जाणार असून, ५० टक्के रक्कम केंद्राकडून दिली जाणार आहे, असे कुंकळ्येकर म्हणाले. शहरातील सीसीटीव्ही सेवा देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), एल अँड टी, हनिबेल आणि एनईएस-जपान या चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. संबंधित कंपन्या जी यंत्रणा शहरासाठी राबविणार आहेत, त्याचे मॉडेल त्यांनी सादर करणे बंधनकारक आहे. निविदा सादर केलेल्या कंपन्यांकडून सध्या शहरातील विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची चाचणी करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत ४५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. त्याबरोबरच संपूर्ण शहरात मोफत वाय-फाय सेवा, पर्यावरणीय सूचना, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट पार्किंग, इंटेलिजन्स ट्रॅफिक सिग्नल, नागरिकांसाठी माहिती कक्ष आदींचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पणजीसाठी विशेष अॅप 

सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले, शहरातील वाहतूक व्यवस्था, सिग्नल, महत्त्वाची कार्यालये आदींसह अनेक घटकांचा समावेश असलेले आणि सर्वांसाठी उपयोगी ठरणारे विशेष अॅप पणजी शहरासाठी तयार केले जाणार आहे. यामध्ये मोटारसायकल पायलटांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठीचे वर्किंग मॉडेल मान्यतेसाठी समितीकडे पाठविण्यात आले आहे. येत्या ७ ते ८ महिन्यांत या प्रकल्पाअंतर्गत सर्वच कामे मार्गी लावली जातील, असेही त्यांनी नमूद केले.

निविदा १५ जूनपर्यंत उघडणार

 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निवड होणाऱ्या कंपनीशी पाच वर्षांचा करार केला जाणार आहे. कॅमेरा सुरू होण्यापासून ते यंत्रणा अद्ययावत करण्यापर्यंतची सर्व कामे केली जाणार आहेत. त्यासाठी संबंधित कंपनीचे २० कर्मचारी शहरात कार्यरत राहणार आहेत. यासाठीची निविदा १५ जूनपर्यंत उघडली जाणार आहे, अशी माहिती सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.