दहावीतही मुलींची बाजी 

९१.२७ टक्के निकाल; ७८ शाळा शंभर टक्के


26th May 2018, 03:06 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, उत्तीर्ण झालेल्यांत मुलींचे प्रमाण ९०.४९, तर मुलांचे प्रमाण ८८.६९ टक्के इतके आहे. ७८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात २१ सरकारी शाळांचा समावेश आहे.

पर्वरी येथील उच्च शिक्षण संचालनालयात शुक्रवारी मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी निकाल जाहीर केला. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव भगीरथ शेट्ये, सहसचिव ज्योत्स्ना सरीन आणि भरत चोपडे उपस्थित होते. दरम्यान, २ ते २१ एप्रिल या कालावधीत राज्यातील २७ केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेला १९,५९६ विद्यार्थी बसले होते. त्यातील १७,८८६ उत्तीर्ण झाले आहेत. ६५५ विद्यार्थी काही विषय घेऊन परीक्षेला बसले होते. त्यातील २५६ जण उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ३९.०८ टक्के आहे. राज्यभरात १०,१५८ मुले परीक्षेला बसली होती. त्यातील ९,००९ (८८.६९ टक्के) उत्तीर्ण झाली आहेत, तर परीक्षा दिलेल्या १०,०९३ मुलींपैकी ९,१३३ मुली (९०.४९ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत.

क्रीडा गुणांचा लाभ; सांस्कृतिक गुणांची प्रतीक्षा

दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८,४५१ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ झाला आहे. ३७६ विद्यार्थी क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ४.४ टक्के आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले सांस्कृतिक गुण मंत्रिमंडळाची मान्यता न मिळाल्याने यावर्षी कोणालाही देण्यात आलेले नाहीत. याबाबत कला आणि संस्कृती खात्याकडूनही काहीच हालचाल करण्यात आलेली नाही, अशी माहिती रामकृष्ण सामंत यांनी दिली.

पुरवणी परीक्षा १५ जून रोजी 

दहावीची पुरवणी परीक्षा १५ जून रोजी होणार आहे. पूनर्मुल्यांकन आणि फोटोकॉपीसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करणे आवश्यक आहे. १ ते ७ जून पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासाठी म्हापसा, पणजी, मडगाव, फोंडा व कुडचडे येथील केंद्रांची निवड करण्यात आली आहे, असे मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी सांगितले.