बेताळभाटीत सामूहिक बलात्काराची तक्रार

पैशांच्या मागणीसाठी जोडप्याला धमकी; संशयितांचा शोध जारी


26th May 2018, 03:50 am
बेताळभाटीत सामूहिक बलात्काराची तक्रार

प्रतिनिधी | गोवन वार्ता

मडगाव : बेताळभाटी येथील सनसेट समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्याला तिघा अज्ञातांनी अडवून त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले तसेच या तिघांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडित युवतीने मडगाव पोलिस स्थानकात दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराचे पुरावे उपलब्ध नसल्यामुळे प्रथमदर्शनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिसियो इस्पितळात पाठविले आहे.

पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर युवतीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पण बलात्काराचे सक्षम पुरावे पोलिसांच्या हाती लागले नसल्यामुळे प्रथमदर्शनी विनयभंगाचा गुन्हा नोंद करणे भाग पडले आहे. पीडितेच्या तपासणीचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बलात्कार स्पष्ट झाल्यास संबंधितांवर बलात्काराचा गुन्हा नोंदविला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सासष्टीतील एक जोडपे गुरुवारी रात्री ९.३० वाजता बेताळभाटीतील सनसेट समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. अर्धातास किनाऱ्यावर फिरून रस्त्याच्या दिशेने येताना जवळच्या झुडुपातून अचानक तिघे अज्ञात बाहेर आले. त्यांनी त्या जोडप्याला अडवून युवतीकडील पर्सची व युवकाच्या खिशांची झडती घेतली. पण त्यांना त्यांच्याकडे जास्त पैसे सापडले नाहीत. त्यांनी सदर युवकाकडे जादा पैशांची मागणी केली. त्यावेळी त्या युवकाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिघेही संशयित त्यांच्या दुचाकीजवळ आले आणि त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितली असता त्यात त्यांना दोनशे रुपये सापडले. त्यानंतर त्यांनी सदर युवकाला मारहाण करून त्याचा मोबाईल नंबर घेतला. आसपास कोणी नसल्याचे पाहून त्यांनी युवतीला झुडुपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. आपण फोन करू त्यावेळी पैसे आणून दे, नाहीतर व्हिडिओ  व्हायरल करू, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर रात्री सदर युवकाला फोन करून त्याला शुक्रवारी सकाळी पैसे देण्यास सांगितले. शुक्रवारी संध्याकाळीही त्यांनी पुन्हा त्या युवकाला फोन करून त्याच्याकडे जादा पैशांची मागणी केली. यानंंतर सदर युवकाने घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पीडित युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 

संशयित स्थानिक ? 

संशयितांचा पोलिसांना सुगावा लागला असून, पोलिसांची पथके त्यांना गजाआड करण्यासाठी त्यांच्या मागावर आहेत. युवकाने मोबाईलवरून त्यांच्याशी बोलणे चालूच ठेवले असून, तिघेही संशयित त्रोटक हिंदी व कोकणी भाषा बोलत असल्याने ते स्थानिक असण्याची दाट शक्यता आहे. तिघेही संशयित पहाटेपर्यंत सापडतील, असे पोलिसांनी सांगितले.