धूम्रपानात घट; तंबाखू सेवनात मात्र टक्क्याने वाढ !

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ चा अहवाल

Story: पांडुरंग गांवकर | गोवन वार्ता |
26th May 2018, 03:10 am

 ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेतून उघड

 इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात तंबाखूचा सर्वात कमी वापर

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : राज्यात तंबाखूचे सेवन २००९-१० सालच्या तुलनेत एका टक्क्याने वाढले असले, तरी धूम्रपान ४.८ टक्क्यांवरून ४.२ टक्के इतके कमी झाले आहे. गोव्यात प्रौढांमध्ये खैनी खाण्याचे प्रमाण वाढत असून, ते ४.१ टक्के असल्याचे ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

राज्य तंबाखू नियंत्रण विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ चा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात धूम्रपान करणाऱ्यांमध्ये प्रौढांची टक्केवारी ४.२ टक्के इतकी आहे. शिवाय ७.९ टक्के पुरुष, ०.४ टक्के महिला धूम्रपान करतात. ९.२ टक्के पुरूष, ३.६ टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. यात ६.५ टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करतात. १५.३ टक्के पुरुष व ४ टक्के महिला यांसह एकूण ९.७ टक्के प्रौढ हे धूम्रपानरहित तंबाखू सेवन करतात, असे म्हटले आहे. 

देशातील सर्व राज्ये व दोन संघ प्रदेशांत तंबाखू वापराचा सर्व्हे करण्यात आला. त्यात गोव्यात तंबाखूचा सर्वात कमी वापर होतो, असे स्पष्ट झाले आहे. तंबाखू वापरणाऱ्यांपैकी ४९.१ टक्के धूम्रपान करणाऱ्यांना व ४४.४ टक्के धूम्रपानरहित तंबाखू सेवन करणाऱ्यांना तंबाखू सेवन सोडण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. सर्व्हेनुसार सध्या जे तंबाखूचा वापर किंवा सेवन करतात, त्यातील तंबाखू चघळणाऱ्या ६२.६ टक्के, तर धूम्रपान करणाऱ्यांपैकी ५१ टक्के जणांना तंबाखू सेवन सोडायचे आहे. २००९-१० मध्ये हे प्रमाण ४९.१ व ४४.४ टक्के इतके होते. सिगारेट व बिडीच्या पाकिटावर असलेला वैधानिक इशारा पाहून अनुक्रमे ६५.६ टक्के व २८.६ टक्के लोकांनी धूम्रपान सोडले आहे. अशा इशाऱ्यांमुळे ३७.३ टक्के लोकांनी धूम्रपानरहित तंबाखू सेवन सोडले आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 इनडोअर व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांमुळे (सेकंड हँड स्मोकमुळे) त्रास होणाऱ्यांची 

टक्केवारी अनुक्रमे १७.९ व १३.८ टक्के एवढी आहे. गेल्या ३० दिवसांत अशा ‘सेकंड हँड स्मोक’चे 

प्रमाण अधोरेखित करण्यात आले आहे. यात घर (१३.९ टक्के), कामाची जागा (१७.९ टक्के), सरकारी 

इमारत (२.४ टक्के), खासगी कार्यालय (२.४ टक्के), आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी 

(२.८ टक्के), रेस्टॉरंट (५.१ टक्के), सार्वजनिक वाहतूक (६.६ टक्के), नाईट क्लब-बार 

(१.७ टक्के) व सिनेमा हॉल (०.६ टक्के) असे प्रमाण आहे.

गोव्यातील टक्केवारी

  दिवसाला ६ ते ३० मिनिटे तंबाखू सेवन करणारे : ४८.९ टक्के 

  ३१ ते ६० मिनिटे तंबाखू चघळणारे : १२.५ टक्के

  पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ तंबाखूचा वापर करणारे : २०.१ टक्के 

  एका तासापेक्षा जास्तवेळ तंबाखू सेवन करणारे : १८.५ टक्के

गोव्यात तंबाखूच्या वापरात मोठी वाढ झालेली नाही, ही आनंदाची बाब आहे. गोवा हे देशातील सर्वात कमी तंबाखू वापरणारे राज्य आहे. फक्त ग्रामीण भागांत धूम्रपानरहित तंबाखूचा वापर वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. तेथे तंबाखू नियंत्रणासाठी भर देण्याची आवश्यकता आहे. 

—डॉ. शेखर साळकर, सचिव, ‘नोट’