प्रवेशाचा निर्णय घेताना

करियरनामा

Story: प्रा. रामदास केळकर |
21st May 2018, 11:54 am


गोव्यातील काही शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांसाठी अच्छे दिन येऊ लागले आहेत. कला अकादमीचा नाट्य अभ्यासक्रमाला गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांना येथील अभ्यासक्रमाचा लाभ त्यांच्या करियरमध्ये होणार. त्याचप्रमाणे आता गोवा संगीत महाविद्यालयात तबल्यात पदव्युत्तर करण्याची संधी येथील विद्यार्थ्यांना देऊ केली आहे. हाही अभ्यासक्रम गोवा विद्यापीठाशी संलग्न केला आहे. गोव्यात परदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्रेंच भाषेचे आकर्षण आहे. आता गोवा विद्यापीठात पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची सोय झालेली आहे. या उत्साहजनक वृत्ताबरोबर जीसीईटी परीक्षेचे निकाल लागले. पण त्यातील भौतिकशास्त्र विषयात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीने चिंता निर्माण झाली आहे. एका विद्यार्थ्याला चक्क शून्य गुण मिळाल्याचे वृत्त आहे. गणित, इंग्रजीनंतर आता भौतिकशास्त्र विषयावर चिंतन होणे आवश्यक आहे.
अलीकडच्या काळात विद्यार्थी मार्क्सच्या आहारी गेल्याने ठरावीक चाकोरीत त्यांचा अभ्यास होत असतो, असे निरीक्षण शिक्षण तज्ञांसह अनेकांनी व्यक्त केले आहे. या चाकोरीबाहेर जाण्याची मानसिकता नसल्याने प्रश्नपत्रिकेत जरा देखील बदल झाला तर त्याचे पडसाद उमटू लागतात. यातून बाहेर येणे अतिशय गरजेचे आहे. कारण यावरच आपले करियर ठरत असते. आता याच सप्ताहात गोवा मंडळाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या दहावीचा निकाल लागणार आहे. या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी आपली पुढील वाटचाल ठरविताना नीट अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा.
खरे तर एप्रिलची परीक्षा साधारणतः १२ एप्रिलला पुरी झाल्यानंतर विद्यार्थ्यांजवळ पुरेसा वेळ होता. या अवधीत आपली शाखा काय असावी? गोव्यात उपलब्ध असलेले पर्याय आदींचा अभ्यास होऊ शकत होता. निदान रोजचे वृत्तपत्र वाचून चालू घडामोडींचा कानोसा घेणे, आपले सामान्यज्ञान वाढविणे आदी गोष्टी करणे सहज शक्य होते. परंतु, फार थोडे विद्यार्थी व त्यांचे पालक या बाबतीत सतर्कता दाखवितात. कला शाखेला चांगले दिवस येऊ शकतात, अशी स्थिती आहे. तत्पूर्वी कला शाखेला दुसऱ्या नावाने ओळखतात ती नावे म्हणजे ह्युमेनिटीज किंवा मानव्यशास्त्र. यातूनच ही शाखा कुठल्या विषयांना प्राधान्य देते हे कळते. यातील मानवाशी निगडीत अनेक विषयांपैकी पुरातत्त्वशास्त्र, संग्रहालयशास्त्र या विषयाकडे पाश्चिमात्य देशात असलेले आकर्षण इकडे दिसत नाही. त्याला एक कारण असे असेल की हे अभ्यासक्रम ठरावीक विद्यापीठातच उपलब्ध आहेत. दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यात अशी सोय आहे. खरे तर आपल्या पर्यटनाभिमुख राज्यात संग्रहालय हे पर्यटकांना आकर्षित करणारे स्थळ होऊ शकते. आज गोव्यात सरकारी तसेच खाजगी स्तरावर डझनभर संग्रहालये आहेत. आता तर मेण्याच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाची त्यात भर पडणार आहे.
यात अजूनही विविधतेने भर घालता येते. ही शाखा तसेच वाणिज्य, व्होकेशनल शाखा पसंत करणाऱ्यांना एक नैसर्गिक लाभ मिळतो तो म्हणजे अतिरिक्त वेळेचा. यावेळेमध्ये तुम्ही आपल्या आवडत्या छंदाला, कलागुणांना न्याय देऊ शकता. शिवणकाम, पेंटिंग, दागिने, जडजवाहीर, रत्ने डिझाईन, व्यायाम, स्वयंपाककला, योगासने, बेकरीचे पदार्थ, घर सजावट, वाचन, समारंभाचे आयोजन, साहित्यिक वा वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन, वृत्तपत्रासाठी लेखन, मुलाखती घेणे, गायन वादन कला शिकणे, आवडत्या खेळात प्राविण्य मिळविणे आदी अनेक करियरपूरक गोष्टी करायला या शाखेतील विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे. असो.
अनेकांचे आकर्षण असलेली शाखा म्हणजे विज्ञान. या शाखेत प्रवेश करणाऱ्यांनी आपल्याला विज्ञान विषयात विशेषतः गणित, भौतिकशास्त्र सारख्या विषयात कितपत गती आहे? याची चाचपणी अगोदर करावी. या विषयात जास्त मार्क मिळविणे मला जमेल का? याचा विचार करूनच निर्णय घ्यावा.