दहावीनंतरचा निर्णय

Story: प्रा. सुभाष जाण |
21st May 2018, 11:53 am
दहावीनंतरचा निर्णय


याच आठवड्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. स्वाभाविकपणे त्यावर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष असते. दहावीची परीक्षा पूर्ण तयारीनिशी देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीची पावती या निकालाने मिळते. करियरची सुरुवात म्हणजे योग्य अभ्यासक्रमाची निवड. अकरावीचा अभ्यासक्रम निवडताना दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण आणि आपली आवड- निवड याची सांगड घालण्यात विद्यार्थ्यांचा बराच वेळ निघून जातो. आपल्या कुवतीनुसार विद्याशाखेची योग्य निवड झाली तरच तो विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.
दहावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास विज्ञान शाखा, प्रथम श्रेणीत तर वाणिज्य आणि जेमतेम गुण घेऊन पास झाल्यास कला, औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम निवडला जातो. अशा ढोबळ आणि अविचारी निवडीमुळे अनेक विद्यार्थी उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण आणि निवडलेला अभ्यासक्रम याचा तसा थेट संबंध नसतोच, असं म्हटलं तरी ते योग्यच होईल. दहावीनंतरच्या अभ्यासक्रमाची निवड करताना आपला कल आणि क्षमता या दोहोंचा अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यायला हवा.
एखाद्या विषयांमध्ये शंभर टक्के गुण घेणारा विद्यार्थी त्या विषयांत हुशार असेलच, याची खात्री देता येत नाही. पाठांतरावर आधारित परीक्षा पद्धतीमुळे सगळा घोळ होतो. अॅप्टीट्यूड टेस्ट म्हणजेच क्षमता किंवा कल चाचणी घेतल्यानंतर विद्यार्थ्याला आपली क्षमता लक्षात येते. अभ्यासक्रम निवडीसाठी ते मार्गदर्शक ठरते.
पालक आपल्या आशा-आकांक्षा मुलांमार्फत पूर्ण करायला जातात, हे कितपत योग्य त्याचा पालकांनीच विचार करावा? आपण डॉक्टर, इंजिनियर बनलो नाही म्हणून मुलाने ती इच्छा पूर्ण करावी, ही अपेक्षाच पूर्णपणे चुकीची आहे. पालकत्वाची जबाबदारी न समजल्यामुळे आपल्या इच्छा-आकांक्षा मुलांवर लादण्यातच अनेकजण धन्यता मानतात. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीसारख्या शिक्षण संस्थेमध्ये आठवी इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाते. त्यांच्या आवडीनिवडी आणि अभ्यास क्षमता पाहिल्या जातात. गोवा शिक्षण विकास महामंडळाने गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणीसाठी प्राथमिक प्रयत्न केले आहेत. या गोष्टीचा पाठपुरावा करुन कल-क्षमता चाचणी सुविधा गोव्यात मोफत आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करुन दिली पाहिजे. पणजी, फोंडा, मडगाव अशा शहरातल्या काही शाळांमध्ये क्षमता चाचणीसाठी प्रयत्न केले जातात.
केंद्राच्या ‘स्कील इंडीया’ या आश्वासक मोहिमेमुळे अनेक नवीन शिक्षणक्रम तयार होत आहेत. कुशल भारत तयार व्हायचा असेल तर कौशल्य वाढवणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर दिला पाहिजे. अकरावी आणि बारावी असे दोन वर्षाचे व्यावसायिक अभ्यासक्रम भरपूर आहेत. पण हे अभ्यासक्रम कौशल्य विकासनासाठी सक्षम वा पोषक आहेत का याचाही विचार झाला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरत हे अभ्यासक्रम तर्कसंगत आणि काळाची गरज ओळखून तयार करायला हवेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड करताना कौशल्य विकास आणि स्थानिक रोजगार निर्मिती या दोन्हींचा विचार आवश्यक आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवायला हवी. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर योग्य विद्याशाखेची निवड झाली नाही तर त्याचा परिणाम थेट भवितव्यावर होतो, याचा प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करायला हवा. दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण बहुतेक विद्यार्थ्यांनी पाठांतराच्या क्षमतेवर मिळवलेले असतात. विषयाचे नीट आकलन न झाल्यामुळे बारावीपर्यंतचा शैक्षणिक प्रवास अशा विद्यार्थ्यांना बराच कठीण जातो. दहावीनंतरची दोन वर्षे ही घडण्याची किंवा बिघडण्याची असतात. पालक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये योग्य समन्वय नसला तर अतिशय महत्त्वाची असलेली ही दोन वर्षे वाया जाऊन विद्यार्थी वाममार्गाला लागण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
गोव्यात आज गावागावात चांगलं आणि दर्जेदार शिक्षण देणारी उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या निकालांतून लहान विद्यालयाची क्षमता आपल्या लक्षात येते. बहुतेक विद्यार्थ्यांचा कल शहरातल्या शाळेत जाण्यात असतो. फक्त आकर्षक कॅम्पस, विद्यार्थ्यांची संख्या अशा निकषांवर न जाता सातत्याने शाळेने दिलेला उत्कृष्ट निकाल, अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक, शाळेतल्या साधन-सुविधा, या सगळ्याचा विचार विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेताना केला पाहिजे. आपला मित्र एखाद्या शाळेत जातो म्हणून आपण जाणे किंवा त्याने एखाद्या अभ्यासक्रमाची निवड केली म्हणून आपण करणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे आणि पालकांनी यासाठी आग्रही भूमिका घ्यायला हवी.
अकरावीचा अभ्यासक्रम निवडण्याआधी चांगल्या करिअर समुपदेशकाकडून सल्ला घेतला तर तो नक्कीच योग्य ठरेल. समुपदेशकाकडे जाणं म्हणजे आपल्यात काहीतरी न्यूनता, हा समज दूर करून समुपदेशक म्हणजे मार्गदर्शक असा विचार करणे योग्य होईल. फोनवर किंवा संगणकावर माहिती महाजाल सहज उपलब्ध असल्यामुळे हवी ती माहिती मिळवण्यात आम्ही भारतीय आघाडीवर आहोत. पण फक्त या माहितीच्या आधारे निर्णय घेणे काहीवेळा धोकादायक ठरू शकते. इंटरनेटद्वारे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग जरूर करा, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. आपण निवडलेल्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाशी तसेच तो अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी चर्चा केली तर अद्ययावत माहिती मिळवण्यास बराच उपयोग होतो.
विद्यार्थ्यांनी दहावीनंतरच्या अभ्यासक्रमाची निवड करताना अनेक गोष्टींचा सारासार विचार आणि सद्सद्विवेकबुद्धीने स्वत: दृढ निश्चयाने घेतलेला निर्णयच त्यांना यश- कीर्तीच्या शिखरावर पोहोचवू शकतो.
(लेखक प्राध्यापक आहेत.)