मंगळुरुतील तीन मुले नागेशी येथील तळीत बुडाली

भट कुटुंबावर दु:खाचा डोंगर

17th May 2018, 03:29 Hrsप्रतिनिधी। गोवन वार्ता

फोंडा : देवदर्शनासाठी मंगळुरुहून नागेशी-फोंडा येथे आलेल्या प्रदीप भट यांची आदिती व्यंकटेश भट (१२), भुवनेश्वर भट (८) व शिवकुमार बालकृष्ण होला (७) ही तीन नातवंडे तेथील तळीत बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळुरू येथील प्रदीप भट व स्मिता भट हे दाम्पत्य आपल्या प्रितम भट व प्रियांका होला या मुली व पाच नातवंडांसह मंगळवारी गोव्यात आले होते. मंगळवारी हे कुटुंब मडगावमध्ये थांबले व बुधवारी नागेशी येथे देवदर्शनासाठी आले. त्यांनी राहण्यासाठी देवस्थानाची खोलीही घेतली होती. 

दरम्यान, आदिती, भुवनेश्वर, शिवकुमार व प्रियांका होलाचा मोठा मुलगा राकेश तळीच्या परिसरात खेळत होते. काही वेळाने राकेश पाणी आणण्यासाठी खोलीकडे गेला असता, इतर तिघेजण खेळता खेळता जवळच असलेल्या तळीत बुडाले. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या तिघांनाही वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. या घटनेमुळे फोंडा परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत 

आहे. फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.