पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपिट

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने चालकांची तारांबळ

17th May 2018, 02:31 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : राज्याच्या काही भागात बुधावारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेकांची धांदल उडाली. त्यामुळे प्रवाशी आणि दुचाकी वाहनचालकांना मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला. पावसाच्या आगमनामुळे रहादारीही काही काळ मंदावली होती.             

मागील काही दिवसांत रात्रीच्यावेळी पाऊस होत आहे. मात्र, बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाचे आगमन झाल्यामुळे विशेषतः नोकरदार वर्गाची पंचाईत झाली. अनेकांना पावसात भिजतच घर गाठावे लागले. राजधानी पणजीसह वाळपई, सांगे, केपे परिसरात ढगाळ वातावरण होते. पणजी शहरात सकाळी कडक ऊन जाणवत होते. मात्र, दुपारनंतर त्यामध्ये थोडासा बदल होत गेला. शहरात दिवसभर कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. सापेक्षित आर्द्रता ७३ टक्के होती. अशाच प्रकारचे वातावरण पुढील काही दिवस राहण्याची शक्यात आहे. 

दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे राजधानीत ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिले होते. कांपाल येथील बालभवन समोरील गटारातील पाणी तुंबून राहिल्यामुळे तेथे गटारांचा अंदाज घेणे वाहनचालकांसाठी कठीण होत होते. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे येथे अगोदरच पाणी साचून राहिले होते. त्यात बुधवारच्या पावसानेही भर घातली. दुसरीकडे हवेत गारवा परसल्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.