ग्रेटर पणजी पीडीएतून बहुतांशी भाग वगळला !

नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांची माहिती

17th May 2018, 03:43 Hrs

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघातील जो भाग ग्रेटर पणजी पीडीएत समाविष्ट केला होता, त्यातील बहुतांशी भाग वगळला आहे, अशी माहिती नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली.

राज्य नगर नियोजन मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आता ताळगाव पठाराचे क्षेत्र व गोवा वैद्यकीय महाविद्यालयाजवळील सरकारी जमीन जास्त असलेले काही क्षेत्र तसेच कदंबा पठारावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा प्रत्येकी १५० मीटरचा परिसर असेच क्षेत्र ग्रेटर पणजीत राहील, असे सरदेसाई म्हणाले. आपण इस्टरच्या पूर्वसंध्येला जसे सांगितले होते, त्याप्रमाणे दहा गावे ग्रेटर पणजीतून वगळण्याची प्रक्रिया आता अंमलात आली आहे. त्याशिवाय बुधवारच्या बैठकीत ग्रेटर पणजीत फक्त नियोजनाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे असलेले क्षेत्रच ठेवून, उर्वरित क्षेत्र वगळले आहे, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर पणजीसाठी पणजी, ताळगाव, बांबोळी, कदंबा पठार असे नियोजन क्षेत्र अधिसूचित केले होते. पणजी महापालिका क्षेत्र व ताळगाव महसुली गाव क्षेत्र याबाबत काहीही तक्रारी नाहीत. त्यामुळे त्यांना हात लावलेला नाही. पण बांबोळी व कदंबा पठार नियोजन क्षेत्रात बदल केले आहेत. त्यातून बहुतांशी भाग वगळला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बांबोळीचे नवे नियोजन क्षेत्र असे असेल      

बांबोळी नियोजन क्षेत्रात पूर्वी कालापूर, बांबोळी, कुडका, कुजिरा व ताळावली या गावांचा भाग होता. आता त्यात काही बदल करून ताळगावची सीमा ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतचा डाव्या बाजूचा काही भाग, गोवा विद्यापीठ ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमपर्यंतचा काही भाग नियोजन क्षेत्रात ठेवला आहे. या क्षेत्रात बहुतांशी जमीन ही सरकारी व पठारी क्षेत्र आहे. इतर सर्व भाग वगळण्यात येतील. त्यासाठी नव्याने अधिसूचना काढली जाईल.

असे असेल कदंबा पठार नियोजन क्षेत्र

कदंबा पठार नियोजन क्षेत्रात चिंबल, ताळावली, गौळी-मौळा, गावशी, आजोशी, करमळी, एला, पानेली व वायंगिणी असा भाग होता. आता मेरशी सर्कल ते जुने गोवेला जाणाऱ्या मार्गावर मिलरॉक फर्न या इमारतीपर्यंतचाच भाग नियोजन क्षेत्रात ठेवला जाईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा १५० मीटरपर्यंतचा परिसर नियोजन क्षेत्रात असेल. बाकीची गावे वगळण्यात येतील. १५० मीटरमध्ये कुठला भाग येतो, ते येत्या काही दिवसांत निश्चित होईल.