सत्तरीला चक्रीवादळाचा फटका

घरे, बागायती, विद्युत खांबांचे नुकसान; लाखोंची हानी

17th May 2018, 03:32 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता

वाळपई : सत्तरी तालुक्यातील विविध भागांत बुधवारी सायंकाळी आलेल्या चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. शिवाय अनेक ठिकाणचे विद्युतखांब कोसळल्याने वीज खात्यालाही नुकसानीला सामोरे जावे लागले. वादळामुळे सत्तरीतील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा सत्तरी तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे घरांवर पडल्याने घरांच्या छताचे तसेच आतील साहित्याचे नुकसान झाले तसेच विविध ठिकाणच्या रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. यातील नुकसानीचा नेमका आकडा अजून स्पष्ट झाला नसला, तरी सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चक्रीवादळाचा मोठा फटका ग्रामीण भागांना असला असून, तेथील काजू व आंबा बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

पुढील ४८ तासांत पावसाची शक्यता

राज्यात पुढील ४८ तास ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची तसेच रात्रीच्यावेळी वादळी वारे वाहण्याची शक्यता शक्यता राज्य हवामान खात्याने वर्तविली आहे. दिवसाच्या तापमानात फारसा बदल जाणवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कमाल तापमान ३४ अंश, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्याचेही खात्याने म्हटले आहे.