सौजन्याची ऐसी तैसी

कथा

Story: अपूर्वा कर्पे | 05th May 2018, 07:38 Hrs


शर्मिलाला सकाळी जरा लवकरच जाग आली. मन कसं जडशील झालं होतं. उत्साहच वाटत नव्हता. कालचा प्रसंग तिच्या मन:चक्षूसमोर उभा राहिला....
अशी का वागली असेल मंजुश्री? खरंच पैसा, प्रतिष्ठा माणसाला कुठच्या कुठे नेते? आपल्यापासून नी समाजापासूनही!.... जसा जसा मनुष्य यशाची पायरी चढत जातो, तसतसं अगोदर समाधानानं मन भरून जातं, हेच समाधान उत्तुंग भरारी घेण्याचं बळ देतं नी मग हळूहळू समाधानाची जागा अहं, व्यापून टाकतो. गर्व, अभिमान, गुर्मी कधी मनाचा ताबा घेतात ते कळतच नाही. नाती दुखावतात, उसवतात, तुटतात. पण त्या यशाच्या कैफापुढे त्यांना त्याची पर्वाच नसते. अगदी हेच झालं होतं मंजुश्रीचं.
हायस्कूलचा पाचवीचा वर्ग. मंजुश्री भेदरलेल्या नजरेनं आत आली नी शर्मिलाला विचारू लागली, ‘पाचवी ब चा वर्ग ना हा?’ तिने हो म्हटल्यावर शेजारच्या रिकाम्या जागेकडे बोट दाखवत तिने विचारलं, ‘मी इथे बसलं तर चालेल?’ शर्मिलाला आवडली ती. छान गोल चेहरा, सावळा रंग, भावूक डोळे, दोन्ही बाजूंनी जाडजुड वेण्या... तिनं लगेच आपली बॅग सरकवून जागा केली.
चौथी मराठीतून इंग्रजी पाचवीत आलेली सगळीच मुलं! दुसरी शाळा, दुसरे शिक्षक, वेगळं वातावरण, अचानक आपण मोठे झाल्याची जाणीव.... सर्वांचीच तशी परिस्थिती होती. एक उत्सुकता, एक हुरहूर... इथं बाई नाही टिचर म्हणायचं, नमस्ते बाई नाही, गुड मॉर्निंग टिचर म्हणायचं असतं, हे कळलं. टिचरनी सर्वांनाच नावं विचारली. तेव्हा तिचं नाव कळलं, मंजुश्री खामकर.... हळूहळू दोस्ती झाली, दाट गहिरी होत राहिली.
एकदा इंग्रजी टिचरनी ‘माय मदर’ वर निबंध लिहायला लावला. सगळा वर्ग इंग्रजी शब्द आठवून निबंध लिहिण्यात मग्न तर ही पेनाशी चाळा करत गप्पाच! बाईंनी तिला उभं कलं. ‘मंजुश्री, काय झालं?’ लिहिना तूही.
‘टिचर.... काही सुचत नाही’ म्हणून ती रडू लागली. नंतर कळलं की ती अगदी लहान असतानाच तिची आई देवाघरी गेली... खूप वाईट वाटलं. घरी जाऊन शर्मिलाने आईला सांगितलं, तिही खूप दु:खी झाली. म्हणाली, ‘बिच्चारी! कधीतरी घरी घेऊन ये तिला’. तो प्रसंगही लगेच आला....
मंजुश्रीचे वडील ऑफिसला गेले होते. आजी तिच्या काकांकडे रहायला होती. शाळा त्या दिवशी कशाला तरी लवकर सुटली. शर्मिला मंजुश्रीला घेऊन आपल्या घरी आली. त्या दिवशी मंजुश्रीसाठी तिच्या आईने थालीपीठ लावलं, मंजुश्रीला ते फार आवडलं. तिची आईशी गट्टी जमली. तेव्हापासून मंजुश्री त्यांच्या घरी येत राहिली. बोलता बोलता तिला खोबऱ्याची कापं व बेसन लाडू फार आवडतात हे कळल्यावर शर्मिलाच्या आईने मुद्दाम तिच्यासाठी तिच्या वाढदिवसाला केले व तिला घरी बोलावून तिचे औक्षण केलं. तिला खूप भरून आलं, मग दर वाढदिवशी हा रिवाजच झाला. आता ती हक्काने आईकडून ओवाळून घ्यायला लागली. कधी कधी नवीन पदार्थ केला तर तिला डब्यातून आई पाठवून द्यायची. दहावीला प्रॅक्टीकल असले की आईच डबा करायची दोघींसाठी. शर्मिला- मंजुश्रीची दोस्ती दहावीपर्यंत अबाधित राहिली.
मंजुश्रीचा आवाज गोड होता, आईने तशी विनवणी करून तिला शास्त्रीय गायन वर्गाला घालायला लावलं. कधी घरी आली की ती आईला गाऊन दाखवायची. आईही कौतुकाने ऐकायची. दहावीनंतर ती आर्टसला गेली व शर्मिला सायन्सला. त्यामुळे कधीमधी भेटीगाठी व्हायच्या. पण हक्काने मंजुश्री शर्मिलाच्या आईला खूपदा भेटून जायची. बारावीनंतर मात्र वडिलांनी मुंबईला बदली करून घेतली. आईनी मुद्दाम तिला जेवायला बोलावलं. त्यादिवशी निघताना मंजुश्री खूप रडली. म्हणाली, ‘शर्मिला, तुला आठवतं? पाचवीत आपल्याला माय मदरवर निबंध लिहायला सांगितला होता. पण आज मी त्यावर कितीही पाने लिहू शकते... तुझ्या आईने मला आई कशी असते ते दाखवून दिलं.’
नंतर पत्रातून, क्वचित फोनवरून दोघींचं कॉन्टॅक्ट चालू होतं. मंजुश्रीने कॉलेजबरोबर संगीतातही विशारद केलं. मध्यंतरी तिचा अचानक फोन आला. शर्मिलाच्या आईशी भरभरून बोलली. म्हणाली की, टीव्हीवर संगीताच्या स्पर्धा आहेत त्यात ती भाग घेतेय... शर्मिलाच्या घरच्यांनी आवर्जून सारे प्रोग्रॅम पाहिले. आता अंगाने मंजुश्री छान भरली होती. गोड दिसत होती, आवाजही छान तयार झाला होता. शर्मिलाने तर घरच्या शेजारी पाजारी, कॉलेजमध्ये सर्वांना मंजुश्री आपली मैत्रीण असल्याचं सांगितलं. त्या स्पर्धेत मंजुश्री दुसऱ्या नंबरला आली. शर्मिलाने खूप छान ग्रिटींग पाठवलं. अधूनमधून फोन यायचे, भरभरून बोलायची.
काळ पुढे गेला. दोघींची लग्ने झाली. मंजुश्रीच्या लग्नाला शर्मिला आईसह गेली होती. चांगल्या कौतुक करणाऱ्या घराण्यात मंजुश्री पडली होती. त्या दोन दिवसात अगदी गळ्यात गळा घालून दोघी राहिल्या. आनंद, दु:ख, समस्या, संघर्षाबद्दल खूप बोलल्या दोघी...
हळूहळू मंजुश्रीचे स्टेज शो होऊ लागले. शर्मिलाच्या लग्नाला मात्र ती येऊ शकली नाही. पण मुंबईच्या कोणा पाहुण्याकडून गिफ्ट पाठवलं होतं आठवणीने. सोशल मीडियावर मंजुश्रीचा सगळा अहवाल मिळायचा. ती आता भारताबाहेरही प्रोग्रॅम करू लागली होती.
परवा अचानक शर्मिलाला आईचा फोन आला, अगं, ऐकतेस का? आपल्या सातेरीच्या देवळाच्या प्रतिष्ठापनेला कोण येते सांग? मंजुश्री! कधी एकदा तिला बघेन असं झालंय बघ. तूही ये हं... मला ते गर्दीत जमणार नाही, तू असलीस की बरं!शर्मिला फार हरखून गेली. वेळात वेळ काढून तिथे हजर झाली. आईने डब्यात बेसनलाडू व खोबऱ्याची कापं करून आणली होती.
‘मॅडम आल्या, मॅडम आल्या’ अशी कुजबुज ऐकून दोघीही दरवाजाजवळ उभ्या राहिल्या. ‘मंजुश्री कशी आहेस गं?’ करत शर्मिला जवळ गेली. मंजुश्रीने लक्षच दिले नाही. साडी ठीक करू लागली. ‘मंजू, आई आलीय’ मंजुश्री फक्त हसली. आयोजकांनी तिला स्टेजवर नेलं. कार्यक्रम छान झाला. कार्यक्रमानंतर चहापान होतं. आई व शर्मिला एक्झीटकडेच उभ्या राहिल्या. मंजुश्री बाहेर आल्याबरोबर शर्मिला म्हणाली,
‘मंजुश्री, आईने तुझ्यासाठी मुद्दाम बेसन लाडू व कापं आणली आहेत’ आईने डबा पुढे केला.
मंजुश्री लक्षच नसल्यासारखं गाडीत जाऊन बसली. त्याआधी तिने मंदिराच्या विश्वस्तांसोबत दोन- तीन फोटोंना पोझ दिली. शर्मिला चेंगटपणे डबा घेऊन गाडीकडे गेली, पण गाडीच्या काळ्या काचा वर काढून मंजुश्रीने ड्रायव्हरला गाडी चालू करण्याची आज्ञा दिली. गाडी भरधाव पुढे गेली.
डबा तसाच हातात उरला. शर्मिला, तिची आईही खूप दु:खी झाली. खिन्न मनानं, जडावलेल्या पावलांनी दोघीही घरी आल्या. घरी आल्यावर शर्मिलाचं कामात लक्षच लागेना, तसाच पसारा ठेऊन ती झोपायला गेली, न जेवताच.
सकाळी तिचा चेहरा पाहून नवरा काय समजायचं ते समजला. शर्मिला कुठंतरी खोलवर फार दुखावली गेली हे कळलं त्याला. म्हणाला, ‘काय झालं शर्मिला, मंजुश्रीने ओळख नाही दाखवली?’ शर्मिलाने एवढा वेळ रोखून धरलेले अश्रू खळकन् बाहेर आले. तिला बसतं करून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ‘अगं, सध्या यश तिच्या डोक्यात गेलंय...अहंकारानं तिच्या मनाचा कब्जा घेतलाय... कधी कधी अहंकारामुळं आपल्याला माणसं गमवावी लागतात. खोट्या अहंपायी आपण माणूस तोडतो, दूर जातो एकमेकांपासून... जेव्हा आपण चुकल्याची जाणीव होते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. वेळ निघून गेलेली असते. पण आपण ठाम रहावं, दुसरा जर अहंकाराने नाती तोडत असेल तर आपण त्याला समजून घेऊन माफ करून टाकावं.... विसरायचा प्रयत्न करावा. हळूहळू त्या जखमेवर धूळ जमेल. पण मनात साठवून नको ठेवूस हा अपमान. जीवनातला एक अनुभव म्हणून त्याच्याकडे पहा.’ किती सोपं, साधं तत्त्वज्ञान होत त्याचं!
मध्यंतरी बराच काळ वाहून गेला. शर्मिलाने मंजुश्रीला मनातल्या तळात गाडून टाकलं! पण सोशल मीडिया मंजुश्रीची पाठ सोडायला तयार नव्हतं. वाचून शर्मिलाला वाईट वाटायचं, ती एक सुस्कारा सोडून म्हणायची, ‘चला! वो भी दिन गये!’ यशानं माणसं हरखून जातात, पण ते क्षणिक असतं. त्यावेळी माणसांना संयमानं वागलं पाहिजे, ही गोष्ट खूप कठीण आहे. कारण यशाचा कैफ, यशाची धुंदी भल्याभल्यांना बरबाद करते... देव मंजुश्रीला शक्ती देवो!
शर्मिलाच्या मुलांची लग्न वगैरे होऊन ती सुखाने संसाराला लागली. दोघा नवरा-बायकाेचा रिटायर जीवन चालू झालं. एकदा शर्मिलाची सगळी फॅमिली टूरवर मॉरिशसला गेली. तिथे एका चांगलं काम करणाऱ्या ‘अल्कोहोलिक अनॉनीमस’ या संस्थेला भेट द्यायला सगळे गेले. तेच काम करणाऱ्या भारतातल्या संस्थेकडे शर्मिलाच्या सोशल वर्कमुळे संपर्क होता. त्यांचं तिथलं कामकाज पाहण्याची अपॉइंटमेंट घेऊन प्रतिक्षागृहगात शर्मिला बसली होती. समोर एक बाई डोक्याला स्कार्फ व डोळ्यांना गॉगल लावून बसली होती. तिच्या लकबी शर्मिलाला खूप ओळखीच्या वाटल्या. एवढ्यात तीच बाई शर्मिलाजवळ येऊन बसत गॉगल काढून म्हणाली, ‘शर्मिला? तू इथे काय करतेस?’ होय. ती मंजुश्रीच होती. पण परिस्थितीमुळे ओळखण्यापलीकडे गेली होती...
चल, आपण कॉफी शॉपमध्ये जाऊ, इथं कोणी ओळखलं तर लगेच फोटो काढतील, इंटरव्ह्यू घेतील. मला त्यासाठी हा स्कार्फ बांधावा लागतो. गॉगल लावावा लागतो. कॉफी शॉपकडे जाता जाता ती म्हणाली, ‘मी ओळखलंच नाही तुला! किती बदललीस तू’ शर्मिला म्हणाली.
‘हो... खूप बदललेय.... जीवनाने सगळं रंग दाखवले बघ मला!’
कॉफी पिता पिता मंजुश्रीच्याच तोंडून तिचा जीवनपट ऐकला. प्रोग्रॅम करता करता मंजुश्री एका संगीतकाराच्या प्रेमात पडली होती. त्यांचं प्रकरण नको तितकं पुढे गेल्यावर नवऱ्याने डायव्होर्स दिला. कोर्टाने एकुलत्या एक मुलीची जबाबदारी नवऱ्याकडे दिली. त्या संगीतकाराबरोबर मंजुश्री लग्न न करता अशीच राहू लागली. एक दोन वर्षात मतभेद वाढू लागले नि त्याने तिला आपल्या घरातून घालवून दिले. स्वाभिमानी मंजुश्री एका मैत्रिणीबरोबर भाड्याने राहू लागली. कॉम्पिटीशन खूप वाढली होती. तिला काम मिळेना, छानछौकीची सवय झालेली, पैसा पुरेना. ती प्यायला लागली. हळूहळू पिणं एवढं वाढलं की वडिलांनी आपल्याकडे नेलं. तिचे उपचार केले. आता पिणं सुटलं, समुपदेशकाचं काम करत होती... एका क्लबमध्ये गायची. जेमतेम पैसे मिळायचे.... परिस्थितीने परत तिला तिथेच आणून सोडलं होतं... काळाच्या प्रवाहात तिचा अहंकार चूर चूर झाला होता, पण जीवनातल्या वीस वर्षाच्या मैत्रीला मात्र दोघी मुकल्या होत्या.
परतताना शर्मिलाला राहून राहून मोबाईलवर आलेला तो कोट आठवत होता-
It depends on how you behave when you have everything and not on how you behave when you have nothing.
(लेखिका नामवंत कथाकार आहेत.)