अॅव्हेंजर्सची ‘एक लोहार की...’

रुपेरी पडदा

Story: सौ. विद्या नाईक होर्णेकर |
05th May 2018, 07:36 am
अॅव्हेंजर्सची ‘एक लोहार की...’


बॉलिवूड आणि हॉलिवूडची तुलना करायची झाली तर नेहमीच एक गोष्ट पहावयास मिळाली आहे आणि ती म्हणजे, बॉलिवूडची स्थिती ही ‘सौ सुनार की...’ अशी असते तर हॉलिवूडची स्थिती ‘एक लोहार की’ अशी असते. हॉलिवूडचा एकच चित्रपट बॉलिवूडच्या दहा चित्रपटांचे यश दृष्टिआड करणारा ठरतो. गेल्या काही वर्षात हेच चित्र पहावयास मिळाले असून, आजही ते कायम आहे.
गेल्या सहा महिन्यात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी यशस्वी कामगिरी केली. १०० कोटी क्लब, दोनशे कोटी क्लबचा आकडा ऐकून आम्ही भारतीय प्रेक्षक अर्ध्या हळकूंडाने पिवळे झालो. मात्र ‘माऊथ पब्लिसिटी’ च्या जोरावर चाललेले आमचे अनेक चित्रपट आज ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ समोर झाकोळले गेले. या चित्रपटाचा पहिला भाग देशभरात प्रदर्शित झाला आणि ‘विक्रमासाठीच प्रदर्शन आपुले’ अशा आवेशात त्याने यश प्राप्त केले. आजवर कुठल्याही हॉलीवूडपटाने भारतात एवढी कमाई पहिल्याच दिवशी केली नव्हती, जेवढी सदर चित्रपटाने केली आहे.
‘डिस्ने इंडिया’ ने प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार या चित्रपटाने देशभरात ४०.१३ कोटी रुपयांची कमाई केली असून यावर्षीचा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ ने पहिल्या दिवशी २५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे तो यावर्षीचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता. मात्र त्याचा फुगा फुस्स करत ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. हॉलिवूड नायकांच्या ‘स्टाईल’ मधील टायगरचा रुपेरी पडद्यावरची अॅक्शन प्रेक्षकांना भावली खरी, परंतु त्याला ‘अॅव्हेंजर्स’ ची सर काही आली नाही. सदर चित्रपटाने देशभरात केवळ २००० चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होऊनही विक्रमी कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय चित्रपटगृहांसाठी ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा सर्वांत मोठा दिलासादायक चित्रपट ठरला आहे. कारण नव्या वर्षात बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट कमाईत मागे पडले आहेत. मात्र ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ ने वादळ निर्माण केले असून, सुट्टीचा हंगाम हे वादळ ओसरु देईल असे निदान सध्या तरी वाटत नाही. आजतागायत हॉलीवूडपटांच्या भारतातील कमाईचा आकडा हा वाढताच राहिला आहे. गेल्यावर्षी हॉलीवूडपटांनी देशात एकूण ८०१ कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतीय चित्रपट व्यवसायाच्या एकूण उत्पन्नापैकी हे प्रमाण १३ टक्के एवढे आहे. यावर्षी मात्र हॉलीवूडपटांच्या देशातील कमाईचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत. त्याची प्रचिती ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ ला मिळालेल्या प्रतिसादातून येते आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर यंदाही वर्चस्व राहील ते हॉलिवूडकरांचं असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरता कामा नये.
गेल्या दोन वर्षांचा आढावा घेता, हिंदी चित्रपटांच्या तुलनेत हॉलिवूडच्या चित्रपटांनी कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. ‘खान-कपूर’ यांची मक्तेदारी मागे पडावी अशी तुफान कमाई हॉलिवूडपट करत आहेत. सुमारे १८९ कोटींची कमाई करणारा ‘द जंगल बूक’ काय किंवा ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन’ काय... हॉलिवूडपटांची गुणवत्ता, तंत्रज्ञान, विषयांची हाताळणी व विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांची भव्यता, या सगळ्याच गोष्टी त्यांच्या यशाला पूरक ठरत आल्या आहेत. विशेष म्हणजे हॉलिवूडपट हे हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांत डब केले जातात. अत्यंत वेधक असलेले हे चित्रपट फारशी जाहिरातबाजीही न करता लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरतात हे विशेष. हॉलीवूडपटांना भारतात उल्लेखनीय प्रतिसाद मिळतो हे वारंवार सिद्ध होत आहे. त्यातही सुपरहिरोपटांबाबत भारतीयांची ‘क्रेझ’ शब्दात सांगायला नको. ‘स्पायडरमॅन’ पासून ते ‘हल्क’ पर्यंत सगळेच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. अगदी बच्चे कंपनीही त्यास अपवाद नाहीत. त्यामुळे ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ चे यश अबाधित ठरले. मुळात हॉलिवूडपट हे केवळ व्यावसायिक धोरणावर तयार होतात, ‘इमोशन्स’ पेक्षा ‘अॅक्शन’ वर त्यांचा भर असतो. वादग्रस्ततेपासून अलिप्त केवळ ‘मनोरंजना’ चे धोरण स्वीकारलेले हे चित्रपट जागतिक प्रेक्षक मिळवण्यात यश प्राप्त करतात ते केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर.
आपल्या देशात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आताच कुठे व्हायला लागला आहे. त्यांनी मात्र या भागात उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे तिथवर पोहोचायला बॉलिवूडपटांना बराच पल्ला गाठावा लागणार असून, आताच त्या दृष्टीने बॉलिवूडकरांनी हालचाली करावयास हव्यात. अन्यथा सर्वाधिक चित्रपट निर्माता देश अशी ओळख असलेला भारत, तंत्रज्ञान व विषय विविधतेबाबत समृद्ध देश होण्यास बराच कालावधी जावा लागेल, व तोपर्यंत हॉलिवूडचा ‘बडेजाव’ पाहण्यातच प्रेक्षकांना धन्यता मानावी लागेल.
(लेखिका नामवंत सिने भाष्यकार आहेत.)
-