मास्टर स्ट्रोक

राज- कथा

Story: संजय ढवळीकर | 05th May 2018, 07:35 Hrs


.........................
‘‘राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला सरकार स्थापनेची ऐतिहासिक संधी, काँग्रेसला मागे टाकून राष्ट्रप्रेमी गोमंतक अठरा जागांनिशी सर्वांत मोठा पक्ष!’’
दै. ‘आजची बातमी’ सह राज्यातील सर्वच वर्तमानपत्रांच्या हेडलाईनमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे प्रतिबिंब उमटले होते. याआधीच्या सलग तीन निवडणुकांत बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या राष्ट्रीय काँग्रेसला चौथ्या निवडणुकीतही स्वबळावर बहुमत मिळेल आणि पुरुषोत्तम काणे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात पुन्हा सत्तेत येईल अशी सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु प्रत्यक्षात निकालातून वेगळेच चित्र दिसले.
सन १९९४ मधील त्या निवडणुकीत चाळीस सदस्यांच्या विधानसभेत बहुमत मिळवण्याची अपेक्षा असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसला सोळाच जागांवर समाधान मानावे लागले. त्याआधीच्या निवडणुकीत १९८९ मध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या आणि त्यानंतरच्या पाच वर्षांत दोन वेळा आमदार फुटल्यामुळे गलितगात्र बनलेल्या राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला मात्र मतदारांनी अनपेक्षितपणे अठरा जागांची बक्षिसी दिली होती. राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाचे नेते उमाकांत सावंत आणि त्यांचे विश्वासू सहकारी नवनाथ शेट्ये यांनी गेल्या पाच वर्षांत आमदारांचे एकेक बुरूज ढासळत असताना पक्ष सांभाळून ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना मतदारांनी, विशेषत: पक्षाबद्दल आपुलकी वाटणाऱ्या ग्रामीण भागातील बहुजन मतदारांनी मनापासून दाद दिली होती. त्याचेच पर्यावसान या पक्षाला अठरा जागा मिळण्यात झाले होते.
या निवडणुकीत चाळीस सदस्यांच्या विधानसभेत राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला अठरा, राष्ट्रीय काँग्रेसला सोळा, युनिफाईड गोवन पक्षाला तीन आणि तीन अपक्ष आमदार निवडून आले.
त्याआधी १९९० ते १९९२ या दोन-अडीच वर्षांच्या काळात राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षात दोन वेळा फूट पडली. पहिल्यांदा चार आमदारांनी पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन केला आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सरकारशी हातमिळवणी केली. या सरकारसमोर नवा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला तेव्हा दुसऱ्यांदा आमदारांचा आणखी एक गट राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षातून बाहेर पडून थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला. या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार भक्कमपणे आपली मुदत पूर्ण करू शकले. त्यानंतर १९९४ मधील निवडणुकीपर्यंतच्या काळात उमाकांत सावंत आणि नवनाथ शेट्ये यांच्या राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाचे विधानसभेतील अस्तित्व ते दोघे व आणखी दोघे असे मिळून चार आमदारांपुरते मर्यादित उरले.
या पार्श्वभूमीवर झाल्या १९९४ मधील विधानसभा निवडणुका. चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम काणे आणि दीर्घ काळ नेतेपदाची आकांक्षा मनात धरून असलेले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार विल्सन डायस यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची धुरा प्रामुख्याने सांभाळली. बडे नेते मार्गदर्शनाला आणि सत्तेची उब उशाला अशा परिस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस सहज पुन्हा सत्ता मिळवेल असा अंदाज वर्तवला जात होता. ना सत्तेचे पाठबळ, ना आमदारांचे, राहिता राहिले दोन नेते अशा अवस्थेतील राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळेल असे बहुतांश राजकीय विश्लेषकांनी गृहितही धरले नव्हते.
‘‘ मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिलेले नाही. राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला अठरा तर राष्ट्रीय काँग्रेसला सोळा जागा मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत नवीन विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष या नात्याने आम्ही उद्या राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहोत.’’
राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाचे नव्याने निवड झालेले नेते उमाकांत सावंत यांनी निकालानंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक होऊन त्यात उमाकांत सावंत यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. उमाकांत सावंत यांनी सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करावा असे या बैठकीत ठरले.
सरकार स्थापनेसाठी पक्षाला तीन आमदारांची कमी पडत होती. युनिफाईड गोवन पक्षाकडे तीन आमदार असले तरी त्या पक्षाची विचारधारा पूर्णपणे वेगळी असल्यामुळे त्या पक्षाकडे पाठिंब्याची याचना करण्यापेक्षा तीन अपक्षांना आपल्या बाजूने घ्यावे असे पक्षाच्या बैठकीत ठरले. अपक्षांशी चर्चा करण्याचे अधिकार उमाकांत सावंत यांना देण्यात आले. एक दोन दिवसांत राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण येईल आणि उमाकांत सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाचे सरकार सत्तेत येईल असे चित्र राज्यात रंगवले जाऊ लागले.
यात चुकीचे काहीच नव्हते. अतिशयोक्ती कसलीही नव्हती. तीन अपक्ष आमदारांना मंत्रीपदे दिली जातील आणि बाकीची मंत्रीपदे राष्ट्रप्रेमी गोमंतकच्या आमदारांना मिळतील असे दिसत होते. उलट राष्ट्रीय काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी तब्बल पाच आमदारांची गरज होती. शिवाय सर्वांत मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेची संधी आधी मिळावी हा विधिमंडळाचा संकेत होता. राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाच्या दृष्टीने ही खरोखरच ऐतिहासिक संधी होती. गोवा मुक्तीनंतर सलग अठरा वर्षे राज्य केल्यानंतर त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी काँग्रेसने दिलीच नव्हती. ती संधी आता दारात आली होती!
गोव्यातील सत्तेचे राजकारण ते. एवढे सरळपणे झाले तर कसे चालेल...!
तिकडे सत्ता हातची गमावण्याची राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांची अजिबात तयारी नव्हती. दूरदृष्टीचे विरोधी नेते उमाकांत सावंत यांच्या हाती एकदा सरकारची सुत्रे गेली तर पुन्हा दशकभर तरी सत्तेत येण्याची आशा बाळगायला नको याबाबत काँग्रेसमध्ये एकमत होते. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यातील दोन सर्वाेच्च नेते पुरुषोत्तम काणे आणि विल्सन डायस यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी जी चुरस चालायची ती वेगळीच. विरोधी पक्षाला सत्ता न मिळता आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे याबाबत या नेत्यांत एकमत होते खरे. मात्र सत्ता मिळण्याची जराही शक्यता दिसली की लगेच नेतेपदासाठी आपले कार्ड पुढे करण्याबाबतत त्यांनी कुचराई केली नाही. आताही तेच तर चालले होते.
राष्ट्रीय काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये समसमान आमदारांचा पाठिंबा काणे आणि डायस यांना होता. त्यामुळे काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड खोळंबली. दिल्लीतून हायकमांडचा प्रतिनिधी येऊन त्याच्या उपस्थितीत नेतानिवड करण्याचे ठरले. तोपर्यंत काणे आणि डायस दोघेही आपापले नेतेपद सिद्ध करण्याच्या राजकीय मोहिमेवर निघाले.
युनिफाईड गोवन पक्षाचे तीन आमदार होते. त्यांचे ख्रिस्ती असणे डायसना खुणावत होते. या तिघांनाही आपल्या बाजूने वळवले तर राष्ट्रीय काँग्रेसच्या बाजूने एकोणिस आमदार झाले असते. मग तीन अपक्षांपैकी दोघांना मंत्रीपदाचे गाजर दाखवले तरी पुरेसे आहे, आपल्या बाजूने बहुमतासाठी आवश्यक असणारे एकवीस आमदार जमतील, असा डायस यांचा राजकीय हिशेब होता. तसे झाले तर काणेंचे नाव आपोआप मागे पडले असते आणि विल्सन डायस यांचे मुख्यमंत्रीपद निश्चित झाले असते. मात्र या साऱ्या हालचाली राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड होऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याआधी पूर्ण होणे आवश्यक होते. कारण सर्वात मोठा पक्ष म्हणून संकेतांना अनुसरून राज्यपालांनी राष्ट्रीय काँग्रेसपेक्षा राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाला पहिली संधी दिली असती.
विल्सन डायसनी सुरू केलेले हे सत्ताकारण लक्षात घेऊन पुरुषोत्तम काणेंनी आपला वेगळाच बेत आखला. युनिफाईड गोवन पक्षाच्या तिघांपैकी एकही आमदार त्यांच्या गळाला लागणे शक्य नव्हते. तीन अपक्षांना घेतले तरी संख्या पुरेशी नव्हती. काणेंनी आपला मोर्चा वळवला थेट राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्षाकडे. या पक्षाचे पाच आमदार पहिल्यांदाच निवडून आले होते. उमाकांत सावंत आणि नवनाथ शेट्ये यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची सुत्रे असल्यामुळे तिथे आपल्याला नेतृत्व कधीच मिळणार नाही अशी खंत मनात बाळगून असलेले महत्त्वाकांक्षी नेते सूर्या गांवकर यांना काणेंनी हेरले. रातोरात काणे त्यांच्या घरी गेले.
‘‘त्या पाच नवीन आमदारांना घेऊन तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये या. माझ्या सरकारात तुम्ही उपमुख्यमंत्री व्हाल. बघा, तुमच्या पक्षात तुम्हाला ही संधी या जन्मात मिळणार नाही. त्या पाचही जणांना मी मंत्री करेन.’’ काणेंनी सूर्या गांवकरांना प्रस्ताव दिला, तो स्वीकारण्यातील राजकीय शहाणपणा गांवकरांना कळत होता. राजकीय सौदा तिथेच ठरला.
‘‘राष्ट्रप्रेमी गोमंतकच्या सहा आमदारांनी त्यांचा पक्ष सोडून चांगल्या राजकीय भवितव्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमच्याकडे आता बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या जमली असून बावीस आमदारांनिशी राष्ट्रीय काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे आताच जात आहे...’’ पुरुषोत्तम काणेंनी काँग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बॉम्बगोळा टाकला. तोपर्यंत उमाकांत सावंत आणि नवनाथ शेट्ये यांनाही आपल्या पक्षातील राजकीय भूकंपाची साधी कल्पना नव्हती.
मुळात निवडून आलेल्या सोळा आमदारांपैकी आठच आमदारांचा काणे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा होता. परंतु, नव्याने आलेले सहाही आमदार काणेंचेच होते. आपोआप काणेंच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले.
उमाकांत सावंत आपले ज्येष्ठ सहकारी नवनाथ शेट्ये यांना सोबत घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनवर निघाले होते. राजभवनच्या प्रतिक्षागृहात जाऊन दोघेही बसले. थोड्याच वेळात तिथे बघावे तर पुरुषोत्तम काणे, फुटीर सहाजणांसह आपल्या वीस आमदारांना सोबत घेऊन तिथे हजर! नेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेले विल्सन डायस तेवढे त्यांच्याबरोबर तिथे नव्हते, परंतु त्यामुळे काणेंचे काही अडत नव्हते.
हातातोंडाशी आलेली सरकार स्थापनेची संधी काणेंनी रातोरात मारलेल्या मास्टर स्ट्रोकद्वारे उधळून लावली, याची पुरती कल्पना उमाकांत सावंत आणि नवनाथ शेट्ये यांना आली. काणेंच्या मास्टर स्ट्रोकला सलाम ठोकण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यापाशी उरला नव्हता.