पंचायत विकासाबाबत मार्गदर्शन

सासष्टीत ३३ पंचायतीत ग्रामसभा : बाल ग्रामस्थांकडून अल्प प्रतिसाद


25th April 2018, 03:45 am
पंचायत विकासाबाबत मार्गदर्शन



प्रतिनिधी | गोवन वार्ता

मडगाव : राज्यात पंचायतराज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सासष्टी तालुक्यातील ३३ पंचायतीत ग्रामसभा घेण्यात आल्या. स्थानिक आमदारांसह पंचायत संचालक अजित पंचवाडकर तसेच मामलेदार व पंचायत अधिकाऱ्यांनी विकासाबाबत ग्रामसभेत मार्गदर्शन केले.      

पंचायत राज दिनानिमित्त नावेलीच्या पंचायतीत आमदार लुईझिन फालेरो यांच्या हस्ते वायफाय जोडणी तसेच चित्र प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सासष्टीतील काही पंचायतीत सकाळच्या सत्रात ग्रामसभा घेण्यात आल्या. तर काही पंचायतीत संध्याकाळच्या सत्रात ग्रामसभा घेण्यात आल्या. केंद्र सरकारने पंचायतराज दिनी मुलांसाठी खास बाल ग्रामसभा घेण्याचा आदेश जारी केला होता. तथापि सासष्टी तालुक्यात बाल ग्रामसभांना मुलांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही.      

सासष्टी तालुक्यात पंचायत राज दिनानिमित्त नावेलीसह तळावली, आके बायश, धर्मापूर, चिंचोळणे, चांदोर, गिर्दोली, कुडतरी, राय, लोटली, नुवे तसेच किनारपट्टी भागातील माजोर्डा-कलाटा, बेताळभाटी, कोलवा, बाणावली, वार्का, ओडली, करमणे आदी ठिकाणी ग्रामसभा घेण्यात आल्या.      

पंचायत संचालक अजित पंचवाडकर यांनी सकाळपासून स्वत:हून विविध ठिकाणी सुरू असलेल्या ग्रमासभांना पंधरा-वीस मिनिटांची वेळ देऊन उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच पंचायत खात्याच्या उपसंचालक स्नेहल प्रभू, अन्य वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी व मामलेदारांनी पंचायतराज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभांमध्ये मार्गदर्शन केले.       

या सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी पंचायतींचा विकास कशा प्रकारे करावा, कार्य कसे करावे व कारभार कशा प्रकारे हाताळावा, त्याचबरोबर पंचायतीत निर्माण होणाऱ्या समस्या कशा प्रकारे सोडवाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले.      

सरकारने पंचायत क्षेत्राचा विकास करण्याबरोबर गावातील लोकांचाही वैयक्तिक विकास करण्यासाठी विविध योजना अंमलात आणलेल्या आहेत. त्या योजनांचा लोकांनी पुरेपूर लाभ घेऊन वैयक्तिक विकास घडवून आणावा, असे आवाहन सरकारी अधिकाऱ्यांनी केले. तसेच पंचायत पातळीवर सरकारतर्फे लोकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

नावेलीत वाय-फाय सेवा सुरू ठेवा : फालेरो      

नावेली पंचायतीने आतापर्यंत गावाचा बराच विकास केलेला असून आधुनिक तंत्रज्ञानानुसार लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नावेली पंचायतीत आता वाय-फाय सेवा सुरू केली आहे. ही सुविधा पुढे सतत सुरू राहिली पाहिजे असे उदगार आमदार लुईझिन फालेरो यांनी पंचायतराज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत काढले. नावेली पंचायतीने यापूर्वी ऑनलाईन सेवा सुरू केली होती. त्यामुळे लोकांना लंडन मध्ये वास्तव्य करून जन्म-मृत्यूचे दाखले व अन्य महत्वाचे दाखले ऑनलाईन सेवेतून मिळत होते. राज्यात ऑनलाईन सेवा सुरू करणारी नावेली ही एकमेव पंचायत ठरली आहे. या पंचायतीने गावाच्या विकासाबरोबर आधुनिक तंत्रज्ञान व लोकांचाही बऱ्याच प्रमाणात विकास केला असल्याचे त्यांनी सांगितले.      

कुक्कुटपालनाऐवजी अन्य व्यवसाय निवडा 

कोलवा पंचायतीत पार पडलेल्या ग्रामसभेत लोकांनी कुक्कुटपालन करण्यासाठी असलेल्या योजनेबद्दल पंचायत खात्याच्या अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले व कुक्कुटपालन करण्यासाठी माहिती मिळविली असता सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना कुक्कुटपालनाऐवजी दुसरा कुठलाही व्यवसाय निवडा असा सल्ला दिला. राज्यात कुक्कुटपालनाच्या धंद्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली जाते. राज्यात सर्वत्र दाट लोकवस्ती असल्यामुळे कुक्कुटपालनाचा धंदा सुरू करणे बरेच कठीण होते. तसेच कोबड्यांना ताबडतोब रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने बरेच नुकसान होते. उत्तर गोव्यात असलेले एक मोठे कुक्कुटपालन तोट्यात चालते. त्यामुळे व्यवसायिकांनी शेजारच्या राज्यांतून कोंबड्यांची आयात करण्यावर अधिक भर दिल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी कुक्कुटपालनाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले.