गोमंतकीय बालकीर्तनकारांनी अक्कलकोटवासीयांची मने जिंकली


25th April 2018, 04:41 am

पणजी : श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात धर्म संकीर्तन महोत्सवात गोमंतकीय बालकीर्तनकारांनी बहारदार चक्री कीर्तने सादर करून अक्कलकोटवासीयांची मने जिंकली. याठिकाणी प्रथमच गोमंतकीय मुलींना कीर्तने सादर करण्याचा बहुमान मिळाला.
या चक्री कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार सुहासबुवा वझे यांच्या शिष्य हभप शिवानी सुहास वझे, हभप रमा विराज शेणवी, हभप दिव्या दत्ता मावजेकर यांनी सुश्राव्य कीर्तने सादर केली.
फोंडा येथील गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालयाच्या बाल कीर्तनकारांनी गोमंतकात कीर्तन परंपरा किती समृद्ध आहे हे दाखवून दिले. बालकलाकारही त्यात निपुण असल्याचे अक्कलकोटवासीयांनी सांगितले. त्यांनी सादर केलेल्या कीर्तनांनी अक्कलकोटवासीय मंत्रमुग्ध झाले. कीर्तन कथनाबरोबरच बहारदार पट्टीतील संगीत, भजन यामुळे चक्री कीर्तनाचा कार्यक्रमच अधिकच रंगला. त्यांना हार्मोयिमसाथ प्रसिद्ध संगीतकार प्रशांत देशपांडे, तबलासाथ रवींद्र क्षीरसागर, पखवाजसाथ ज्ञानेश्‍वर दुधाणे आणि मंजिरीसाथ दामोदर कामत यांनी केली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी कीर्तनकारांचे स्वागत केले. धर्मकीर्तन उत्सव समितीचे कार्यक्रम संयोजक डॉ. हेरंबराज पाठक यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा