लाॅरेन्स रॉड्रिग्जला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी


25th April 2018, 04:41 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बनावट बोनाफाईड प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी उत्तर गोवा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पणजी पोलिसांना शरण आलेल्या सांताक्रुझ पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच लाॅरेन्स रॉड्रिग्ज याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
उत्तर गोवा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पंच लाॅरेन्स रॉड्रिग्ज पणजी पोलिसांना सोमवार दि. २३ रोजी शरण आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली होती. अटक केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी त्याला पोलिस कोठडीसाठी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आला. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली.
संशयित लाॅरेन्स रॉड्रिग्ज यांनी पंचायत निवडणूक काळात इतर मागासवर्गीय जमातीचा दाखला मिळवण्यासाठी बनावट बोनाफाईड प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गणेश चोडणकर यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी त्याच्या विरोधात भादंसंच्या कलम ४६५, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता असल्याने संशयित रॉड्रिग्ज यांनी उत्तर गोवा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. त्यानंतर सोमवारी सकाळी रॉड्रिग्ज अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली.