लोकांनी संघटितपणे कार्य करणे गरजेचे : कवळेकर

दलित सेवा संघटनेच्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार


25th April 2018, 05:39 am

वार्ताहर। गोवन वार्ता
नावेली : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार देशाचा व्यवहार चालतो. परंतु, काही लोक घटना बाजूला ठेवून हुकूमशाहीने लोकांचे हक्क मोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी लोकांनी संघटित राहून कार्य करणे गरजेचे आहे, असे उद्गार विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी नुकतेच रवींद्र भवन, मडगाव येथे काढले.
दलित सेवा संघटनेचे अध्यक्ष, सदस्य आणि कला व संस्कृती संचालनालयातर्फे संघटनेच्या २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नावेली मतदारसंघाचे आमदार लुईझिन फालेरो, नगरसेवक अविनाश शिरोडकर, ज्येष्ठ सल्लागार गोकुळदास शिरोडकर, संघटनेच्या अध्यक्षा भारती म्हापसेकर, उत्तम रेडकर, मिलिंद माटे उपस्थित होते.
या कार्यक्रमाअंतर्गत माजी सभापती तोमाझिन कार्दोज, शरद प्रभुदेसाई, डॉरिस टेक्सेरा, दीपा शिरोडकर, अपन्ना मुरगोड, बाबू गडेकर, उमेश साकोर्डेकर, अनुराधा मोघे, मनोहर भिंगी, दामोदर कुडाळकर, मनोज कोरगावकर यांचा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लुईझिन फालेरो, अविनाश शिरोडकर व मिलिंद माटे यांनीही आपले विचार मांडले. सत्कारमूर्तींच्या वतीने तोमाझिन कार्दोज यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेचे आभार मानले.
या कार्यक्रमांतर्गत संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त घेतलेल्या रांगोळी, चित्रकला आणि पाककला स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी बक्षिसे वितरित करण्यात आली. तसेच वर्षपद्धतीप्रमाणे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.