पेडण्यातील सहा शाळांत ‘स्मार्ट’ वर्ग

सामाजिक सेवा उपक्रमाअंतर्गत जीएमआरची योजना


25th April 2018, 01:02 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : पेडणे तालुक्यातील नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय हरित विमानतळाचे कंत्राट मिळालेल्या जीएमआर कंपनीकडून सामाजिक सेवा उपक्रमाअंतर्गत विविध योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्वांत मोठा प्रकल्प उभा राहणाऱ्या या परिसरात विविध उपक्रम राबवून येथील स्थानिक पातळीवर जनसंपर्क विस्तारासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे. यांतूनच येथील सहा शाळांत ई-अभ्यास धर्तीवर ‘स्मार्ट’ वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.      

राज्य नागरी उड्डाण खात्याकडे या उपक्रमाची माहिती जीएमआर कंपनीकडून देण्यात आली आहे. या योजनेसाठी हुतात्मा बापू गावस हायस्कूल (चांदेल), ज्ञानदीप विद्यालय (कासारवर्णे), सरकारी माध्यमिक शाळा (मोपा), सरकारी माध्यमिक शाळा (तोर्से) तसेच नागझर आणि वारखंड येथील माध्यमिक शाळांचा समावेश आहे.       

ई-अभ्यास उपक्रमाअंतर्गत लागणारी सर्व इलेक्ट्रॉनिक सामग्री तथा सॉफ्टवेअर आणि डिजिटल पाठ्यपुस्तके संबंधित शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी विशेष ‘स्मार्ट वर्ग’ तयार केला जाईल. हे स्मार्ट वर्ग चालवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती कंपनीकडून केली जाईल. या व्यतिरिक्त संबंधित माध्यमिक शाळेतील शिक्षकांनाही ‘स्मार्ट वर्ग’ चालविण्यासाठीचे प्रशिक्षण कंपनीकडून दिले जाईल.       

देशभरात ३०० शाळांत उपक्रम

देशात जीएमआर कंपनीकडून त्यांचे प्रकल्प असलेल्या ३०० शाळांत अशा पद्धतीचा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यात येत आहे. सुमारे ३० हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. या उपक्रमामुळे पेडणे तालुक्यातील विद्यार्थ्यांना ही नवी संधी उपलब्ध होईल. आत्तापर्यंत राज्य सरकारकडून ई-अभ्यास योजना राबविण्याच्या अनेक घोषणा झाल्या; परंतु त्या प्रत्यक्षात काही उतरू शकल्या नाहीत. आता मोपा विमानतळ प्रकल्पाच्या निमित्ताने का होईना; परंतु जीएमआर कंपनीकडून ही योजना प्रत्यक्षात उतरविली जाणार आहे.