उपनिरीक्षक रेडकर यांची बदली

मृताच्या मित्राला शिवीगाळ केल्याचे प्रकरण


25th April 2018, 01:00 am

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : मृताच्या मित्राला शिवीगाळ करून लाथा घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक सुदन रेडकरचा ‌व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्यानंतर नाचक्की झालेल्या पो‌लिस खात्याने मंगळवारी रेडकरची गोवा राखील दलात बदली केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश केपेचे उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांना देण्यात आले आहेत.       

पोलिस उपनिरीक्षकाच्या या वागणुकीसंबंधातील सविस्तर वृत्त मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’मध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झाले होते. सोमवारी दिवसभर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात सांगे पोलिस स्थानकाचा एक अधिकारी रागाच्या भरात एका मृताच्या मित्राला शिवीगाळ करताना व लाथ मारताना दिसत आहे. व्हिडिओत बाजुलाच एक शव दिसत आहे. या व्हिडिओमुळे पोलीस दलाची नाचक्की झाली. चौकशीनंतर या उपनिरीक्षकाचे नाव सुदन रेडकर असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, मंगळवारी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस महासंचालकांनी उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांना या प्रकरणी तपास करून अहवाल देण्याचे आदेश देत उपनिरीक्षकाची तत्काळ आल्तिनो येथील राखीव दलात बदली करण्याची सूचना केली. देसाई यांनी चौकशी करून अहवाल दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांना सादर केला आहे.       

सांगे पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर उपनिरीक्षक रेडकर अन्य पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले होते. मृत व्यक्तीसोबत पिकनिकसाठी आलेल्या अन्य दोघांकडून मृताविषयी काहीच माहिती मिळत नसल्यामुळे पोलिसांचा पारा चढला. त्यात मृताचा एक सहकारी पोलिसांना उलट उत्तरे देऊ लागला. त्यामुळे संतापलेल्या उपनिरीक्षक सुदन रेडकर यांनी त्याला अर्वाच्च शिवीगाळ केली आणि कंबरेत एक लाथही हाणली. मंगळवारी सायंकाळी उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दक्षिण गोवा अधीक्षकांची भेट घेऊन प्रकरणाची कल्पना दिली आहे.

उपनिरीक्षक रेडकर यांचे निलंबनही शक्य

मृताच्या मित्राशी अयोग्य वर्तणूक केल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला होता. या संदर्भात मंगळवारी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका‌ऱ्यांनी चौकशी सुरू केली. चौकशी अहवाल येईपर्यंत रेडकर यांची आल्तिनो येथील राखीव दलात बदली करावी, अशा सूचना दिल्यानंतर रेडकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अहवाल आल्यानंतर रेडकर यांचे निलंबनही होऊ शकते.