राशी बनी

हॅलो जिंदगी

Story: भारती पावसकर |
21st April 2018, 07:36 am


एक नाव. राशी बनी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचं. एक बहुगुणी रंगमंचीय कलाकार आणि त्याहीपेक्षा आपल्या मतांवर ठाम राहणारी एक संवेदनशील व्यक्ती. माझी तिची अजिबात ओळख नव्हती. तिच्याबद्दल मला एक अक्षरही ठाऊक नव्हतं. तिचं नावही माझ्या परिचयाचं नव्हतं. पण ती गोव्यात येतेय समजल्यावर, का कुणास ठाऊक तिच्याशी संपर्क करावा असं तीव्रतेनं वाटलं. हा कर्मधर्मसंयोग.
मी राशीला थेट फोन लावला, मेलही धाडला, काही प्रश्न सोबत जोडले. आश्चर्य म्हणजे, मला लगोलग संदेशही आला - ‘सध्या चालू सत्रात असल्यानं ती नंतर संपर्क साधेल.’ मग ती विमानात, प्रवासात अडकली. माझ्या प्रश्नांची उत्तरं फोनवर टेप करून धाडते म्हणाली खरी, ‘पण विमानात खूप घरघर होती, म्हणून रेकॉर्ड नाही केलं, कारण तुला गोंगाटात काही ऐकताच आलं नसतं,’ असं सांगत गेस्ट हाऊसला पोचल्या पोचल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं फोनवर रेकॉर्ड करत व्हॉटसअॅपवरून एकेक करून धाडली. एकेक येत गेलं, मी ऐकत राहिले. तिचा हा फोनवरचा मोनोलॉग खूप भावला. किती छानपणे उकल करत होती ती प्रत्येक गोष्टीची.
प्रश्नांना सविस्तर जबाब द्यायचा तिचा शिरस्ता. सारं आटपेस्तोवर रात्रीचे बारा वाजले. कार्यशाळेचं सत्र, नंतर प्रवासाची दगदग. ‘आणखी काही माहिती हवी असल्यास सकाळी पाठवेन’ म्हणाली. काही फोटो मिळाले. सारं नेटकं. राशी इतकं छान, मनमोकळं बोलली. तिनं माझ्यावर छाप टाकली. फार कमी लोक इतक्या प्रामाणिकपणे बोलतात. प्रत्यक्ष न झालेल्या आमच्या एकाच भेटीत माझी तिच्याशी ट्यूनिंग जुळली.
लेखनाच्या पेशामुळं मी अनेकांना भेटत असते, मुलाखती, संवाद साधत असते, लिहित असते. राशी वेगळी वाटली. मैत्री करावी असं तिच्यात बरंच काही आहे. जीवनाचा भरभरून आस्वाद घेत, रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, असं गात ती जगतेय. आई पुरस्कार विजेती रंगमंच कलाकार, जलसफरीवर निघालेले खलाशी वडील. दोघांचा स्वभाव रसिक, जोडा अनुरूप. नाटक, कला, संगीत सारं ओतून वाहतंय असं आयुष्य लहानपणापासूनच वाट्याला आलेली राशी कशी काय आध्यात्मिक वळणावर थबकली हे नवल. जीवनावर, कलेवर प्रेम तिचं निस्सीम प्रेम. यशाचे प्यालेच्या प्याले वाट्याला आले, नाव, यश, कीर्ति सारं वारेमाप पदरी पडलं. तरीही तिचे पाय जमिनीवरच. पंखांत उडण्याची उमेद, आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय. पण जमिनीशी नातं आणि नाळ न तोडणारी ही न पाहिलेली, न भेटलेली राशी मला खरंच आवडली. रंगमंचीय जीवन जगत असतांना प्रत्यक्ष आयुष्यालाही असोशीनं भिडणाऱ्या राशीचं कौतुक करायला हवं. माय वर्क इज माय प्ले, म्हणत ती आपलं नाटक, नाटकातली प्रत्येक भूमिका जगते. म्हणूनच तिची नाटकं जिवंत होत असावीत. गंमत म्हणजे जगण्याची ही कला ती इतरांनाही शिकवते. नाट्यकार्यशाळा घेते. साऱ्यांचंच जगणं कसं जिवंत, सर्वांगसुंदर करता येईल हे पाहते.
तिचा सीव्ही नजरेखालून घातला, अनेक बक्षिसं, पुरस्कार तिला मिळालेले दिसले. ‘पुरस्कारांसाठी मी काम करत नाही’, असं ती ठामपणे सांगते. ‘मी काम करत गेले, पुरस्कार आपोआप येत गेले. किती, याचीही नोंद मी ठेवली नाही. माझ्यापेक्षा माझ्या पुरस्कारांचं अप्रूप माझ्या घरच्यांना व सग्यासोयऱ्यांनाच जास्त असतं’, असं तिचं म्हणणं. विज्ञानविद्यार्थी राशीनं आपल्याला नाटक अधिक भावतं हे जाणलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. हा साक्षात्कार झाल्यावर ती अमेरिकेला गेली. नाटक कलेचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. मग भारतात परतल्यावर तिचं नाटक करिअर सुरू झालं. काही सोलो, एकपात्री भूमिका केल्या, त्या खूप गाजल्या. तिचं नाव चर्चेत आलं. कलेचं चीज झालं. सचोटीनं काम करत राहिलं की यशाचं माप हमखास पदरी पडतं. राशी आज मोठी बनलीय, पण छोट्यांनाच नव्हे तर मोठ्यांनाही आनंदी कसं राहावं याचे धडे ती देते. स्वत:ही तशीच जगते. नाट्यकार्यशाळेत इतर लहानग्यांना शिकवणाऱ्या राशीची आपल्या दहा वर्षांच्या लेकाशी खास दोस्ती आहे. त्याचा फोटो धाडत तिनं सांगितलं, हा माझा लेक, जादू. राशीच्या जादूनं, जादूच्या राशीनं माझ्यावरच गारूड केलंय जणू.
(लेखिका ‘द गोवन’ च्या पत्रकार आहेत.)