मानसिक आजार आणि आम्ही

समुपदेशन

Story: अलका दामले |
21st April 2018, 07:36 am
मानसिक आजार आणि आम्ही


गेल्या वर्षभरात मानसिक आजारांवर आधारित, काही मराठी चित्रपट गोव्यात दाखविण्यात आले. ‘अस्तु’ आणि ‘कासव’ हे त्यापैकी दोन. स्मृतिभ्रंश झालेल्या वृद्धाची आणि त्याच्या कुटुंबियांची अगतिकता ‘अस्तु’ मध्ये आहे. तर ‘कासव’ मध्ये नुकताच मिसरूड फुटलेला मुलगा आणि त्याला आलेलं औदासीन्य या बाबीची कासवाशी तुलना करून, निसर्गातून काय काय शिकण्यासारखं आहे, हे प्रभावीपणे मांडलं आहे.
हे चित्रपट पाहिल्यावर झालेल्या चर्चांमध्ये दिसून आलं की जनतेला डिमेंशिया, अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन ही मानसिक आजारांची नावं जरी माहीत असली तरी त्यातील बारकावे आणि ते कुणालाही कधीही होऊ शकतात याविषयी अनभिज्ञता, गैरसमजुती आहेत. असा आजार झालेल्या रुग्णाशी घरातल्यांचा आणि समाजाचा व्यवहार कसा असावा, याबाबतही जागरूकता करण्याची जरुरी आहे, याची जाणीव झाली. म्हणूनच काही गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा या व इतर १-२ लेखांतून प्रयत्न करणार आहे. कारण सामाजिक स्वास्थ्य हे मानसिक आरोग्यावर बहुतांशी अवलंबून असतं.
मानसिक स्थिती ही मेंदूतील डोपामिन आणि सिरोटोनिन या रासायनिक द्रव्यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. मेंदूतील या रसायनांचे प्रमाण बदललं, बिघडलं तर मनातील भावना बदलतात. सिरोटोनिन कमी झालं तर उत्साह, आनंद कमी होतो. औदासीन्य येतं, असे दिसून आले आहे. या द्रव्यांच्या समतोलासाठी शारीरिक व्यायाम हा आवश्यक. म्हणूनच खेळ व व्यायाम याला मनोरंजनात्मक उपक्रम म्हणून संबोधलं जातं. सर्वांगीण विकासासाठी याची आवश्यकता आहे. पण तरीही कधी वृद्धत्व, आनुवंशिकता तर कधी इतर सामाजिक परिस्थितीमुळे माणूस मनोरुग्ण होतो.
डिमेंशिया म्हणजेच स्मृतिभ्रंश, अल्झायमर, नैराश्य, स्किझोफ्रेनिया याची सुरुवातीची काही लक्षणं जरी थोडीफार सारखीच असली, तरी हे आजार होण्याची कारणं मात्र भिन्न आहेत. उपचार पद्धतीतही फरक. सर्व साधारणपणे स्मृतिभ्रंश, अल्झायमर हे उतार वयात होतात, तर अपयश, अपेक्षाभंग, आयुष्यातील ताण तणाव यांच्याशी सामना करताना दमछाक होऊन नैराश्य आयुष्यात कधीही, कुणालाही येऊ शकतं. पण, स्किझोफ्रेनिया मात्र बहुधा वयाच्या ऐन तारुण्यात डोकं वर काढताना आढळतो.
स्मृतिभ्रंश साधारणपणे वयाच्या साठी पुढे होताना आढळतो. सुरवातीला व्यक्तीचं किंवा पाहिलेल्या सिनेमा, नाटकाचं नाव पटकन न आठवणे, खोलीत जाऊन कशाला गेलो हे विसरणे, मुद्दाम आठवण रहावी म्हणून प्रयत्न करूनही आयत्यावेळी विस्मरण होणे अशा क्षुल्लक वाटणाऱ्या बाबी घडायला लागतात. वय झालं म्हणजे विस्मरण होणारच असं नाही. विस्मृतीच्या या पहिल्या टप्प्यात तात्पुरती स्मरणशक्ती गोठायला लागली तरी कायमस्वरूपी स्मरणशक्ती शाबूत असते. पण हाच विसरभोळेपणा जेव्हा रोजच्या दिनचर्येत जाणवू लागतो म्हणजे आपण अंघोळ केली की नाही किंवा घरातून बाहेर पडल्यावर कशासाठी बाहेर पडलो ते न आठवण किंवा रोज भेटणाऱ्या व्यक्तीचं नाव पटकन लक्षात न येणं असं होऊन एकंदरीतच आपला आत्मविश्वास डळमळू लागतो, तेव्हा मात्र काहीतरी बिनसले आहे हे समजून वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. वयोमानाप्रमाणे झीज होऊन मेंदूची कार्यक्षमता बदलत असली तरी हे विसरणं जेव्हा रोजचंच होऊ लागतं तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्मृतिभ्रंश हे केवळ एखाद्या गोष्टीचं विस्मरण असतं. केवळ वयाचा दोष न मानता वेळेत वैद्यकीय मदत घेतली तर मेंदूच्या व्यायाम प्रकारांनी आणि मेमरी क्लिनिक सारख्या आधुनिक उपचारांनी स्मृतिभ्रंश नियंत्रणात येतो.
अल्झायमर्स मात्र केवळ गोष्टींचं विस्मरण होण्यापुरता मर्यादित नाही. तसं बघितलं तर स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर्स यातील वेगळेपणा खूप धूसर आहे. प्राथमिक तपासणीमध्ये ज्या वेळेस स्मृतिभ्रंशाचं कारण कळत नाही, तेव्हा तो अल्झायमर्स संबोधला जातो. म्हणूनच अल्झायमर्स म्हणजे बरा न होणारा, पण काही अंशी काबूत ठेवता येणारा स्मृतिभ्रंश. विस्मरणाबरोबर जेव्हा एकप्रकारचा भ्रमिष्टपणा म्हणजे सारखे हात धूत राहणे, परत परत तेच तेच बोलणं- विचारणं, कोणाचंही काहीही न पटणं किंवा मनात असेल तसंच करणं हा वागण्यातील बदल व्यक्तीमध्ये जाणवू लागतो किंवा स्थळकाळाचं भान न राहणं ही स्थिती आढळते तेव्हा ती व्यक्ती अल्झायमर्सची शिकार झालेली असते.
हे दोन्ही आजार वयाच्या साठीनंतर होताना आढळतात. दोन्ही मध्ये रुग्ण परावलंबी होतो. कुक्कुलं बाळ होतो. पण हे उतार वयातील बालपण मात्र घरातल्या सर्वांनाच नकोसं वाटतं. हतबलता येते. काय, कसं करायचं माहीत नसल्याने नैराश्य येतं. म्हणूनच परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी काळजी घ्यावी.
स्किझोफ्रेनिया मात्र प्रथम दृश्यस्वरूप १५ ते ३० वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येतो. मेंदूतील काही पेशींमध्ये रासायनिक बदल झाल्यामुळे होणारी मानसिक व्याधी म्हणजे स्किझोफ्रेनिया! विचार भावना आणि कृती यात फारकत पडणे म्हणजे स्किझोफ्रेनिया. लहानपणी ‘आहे जरा हट्टी, विचित्र स्वभाव’ असं समजून किंवा हा असा वागतो हे समजलं तर लोक काय म्हणतील, या विचाराने काय करावं या बाबतीत संभ्रम निर्माण होतो आणि दुर्लक्ष केलं जातं. मुलाच्या वागण्यात काहीतरी ‘नॉर्मल’ नाही हे कळत असतं, पण इतर काही बाबींमुळे जसं ‘अभ्यास करतो आहे न् नीट, शाळेतून काही तक्रार तर येत नाही ना?’ असा विचार करून विक्षिप्त वागणं दृष्टिआड केलं जातं. या आजाराने ग्रस्त व्यक्ती नेहमी अतिसंशयग्रस्त असते. सर्व जग आपल्या विरुद्ध आहे, अशा भावनेने त्रस्त, वैतागलेली असते. अशा व्यक्तीला वेगवेगळे भास होतात, ते कधी आपल्याशीच हसतात, कधी कधी बोलतातही. कारण त्यांना वेगवेगळे आवाज ऐकू येत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर क्वचितच काही हावभाव, आनंद, दु:ख आढळतं. हा आजार आनुवंशिक असला तरी मानसिक आणि सामाजिक कारणंही तितकीच महत्त्वाची आहेत.
कधी कधी तणाव हाताळता न आल्याने तरुण व्यसनाधीन होतो. परिणीती मानसिक संतुलन ढळण्यात होते. एकदा का ते हरवलं की मनुष्य नैराश्यग्रस्त होतो. किंबहुना नैराश्य येणं ही कुठल्याही मानसिक आजाराची पहिली पायरी. आज आजूबाजूला कुमार वयातील मुलींवर होणारे अत्याचार, जातीपाती वरून होणाऱ्या हाणामाऱ्या, आत्महत्या किंवा रक्ताच्या नात्यात होणाऱ्या हत्या किंवा एकंदरीतच वाढत जाणारी तेढ, हेवेदावे हे सर्व वाचलं, पाहिलं की वाटतं आज मानसिक आजार ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. वाढता सामाजिक संघर्ष, रोजच्या जीवनातील ताणतणाव या सर्वाचा अनिष्ट परिणाम मानसिक स्वास्थ्य असंतुलित करत आहे. दोन पायांचा प्राणी हा भूतलावरचा सर्वात भयंकर अघोरी प्राणी आहे, असं म्हणायला भाग पाडत आहे. राष्ट्राला जर समृद्ध, विकसित बनवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेवटी एक मात्र सांगावसं वाटतं की सगळ्यात उत्तम म्हणजे ‘खुदही को कर इतना बुलंद की हर तहरीर से पहले खुदा बंदेसे पूछे - बता तेरी रजा क्या है?’ मन खंबीर, पण संयमी, शांत, प्रसन्न, विवेकशील असेल तर जीवनात येणाऱ्या कुठल्याही वादळाला आपण पार करू शकतो. मानसिक आजार निश्चितच चार हात दूर ठेवू शकतो.
(लेखिका समुपदेशक, समाजसेवक आहेत.)