हुंडा प्रथेवर टीका

वाचू आनंदे

Story: सखाराम शेणवी बोरकर |
21st April 2018, 07:33 am
हुंडा प्रथेवर टीका


गोव्यात जत्रा, काले, वर्धापनदिन, तसेच शिमगोत्सवानिमित्त विविध नाटके होतात. पूर्वी गावातील तरुण महिनाभर तालमी घेऊन नाटके करायचे. मात्र आता कुठल्याही व्यावसायिक संस्थेकडून ती करवून घेतली जातात. याला अपवाद आहे. पूर्वी बहुतेक नाटके मराठी असत, मात्र आता त्यांची जागा कोकणी नाटकांनी घेतली आहे. अलीकडेच संदेश श्रीकांत बांदेकर या कारवार येथील तरुणाचे ‘बायल म्हागेल हुशार’ हे कारवारी शैलीतील कोकणी नाटक प्रकाशित झाले. हे त्यांचे पहिलेच पुस्तक. गोवा कोकणी अकादमीच्या ‘पयलो चंवर’ या योजनेखाली ते प्रकाशित करण्यात आले आहे.
कोकणीत अडीच, तीन तासाची नाटके तशी कमीच. आज तीन तास नाटक पाहण्यास कोणाला वेळ नाही. दोन तास आयुष्यातील ताणतणाव विसरून निखळ हसायचे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे एका पाठोपाठ विनोदी नाटके येत गेली. आज प्रेक्षकांनाही तीच आवडतात.
घरांमधील धुसफूस, भांडणे, गोडीगुलाबीने कामे करून घेणे, चुगल्या करणे, मस्का लावणे वगैरे सर्वत्र आढळणारे प्रकार या ‘बायल म्हागेल हुशार’ या नाटकात पहायला मिळतात. यात लेखकाने मोजकीच पात्रे व प्रसंग वापरले आहेत. खुसखुशीत संवाद हे या नाटकाचे वैशिष्ट्य.
कथानक दिनेश व सुमन या दोन प्रेमिकांभोवती व त्यांच्या कुटुंबाभोवती फिरते. दिनेशचे कुटुंब हुंड्याला हपापलेले असते. पण, हुशार बायको (सीता- सुमनची आई) आपल्या मुलीचे लग्न एकही पैसा खर्च न करता या श्रीमंत कुटुंबात लावून देते. यासाठी ती केवळ शब्दांचा खेळ करून त्या कुटुंबाला खेळवते.
लेखकाने या नाटकात केवळ प्रेक्षकांचे दोन घटका मनोरंजन केलेले नाही, तर समाजप्रबोधनही केले आहे. हुंड्यासारख्या वाईट, समाजविघातक प्रथेवर त्यांनी असंख्य वार केले आहेत. विशेष म्हणजे या नाटकात कोकणीच्या कारवारी बोलीतील हरवत चाललेले बरेच शब्द आहेत. कारवारी म्हणींचाही लेखकाने सढळ हस्ते वापर केला आहे. त्यामुळे या नाटकाला एक वजन प्राप्त झाले आहे. नाटकातील संवाद खुसखुशीत व परिणामकारक झाले आहेत. विशेष म्हणजे, नाटक पाहताना प्रेक्षक भाषेच्या प्रेमात पडतील, यासाठी लेखकाने प्रयत्न केले आहेत. त्यात ते यशस्वी झाल्याचे नाटकाचे पुस्तक वाचताना जाणवते.
कारवारमधील कोकणी चळवळीतील एक कार्यकर्त्या श्रीमती उषा राणे यांची प्रस्तावना या नाट्यपुस्तकाला लाभली आहे. कुठल्याही तऱ्हेचे साहित्यिक वातावरण नसताना केवळ कोकणी भाषेच्या प्रेमापोटी लेखक झालेल्या संदेश बांदेकर यांचे हे पहिलेच पुस्तक वाचनीय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या नाटकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ अमोल नाळकर यांनी तयार केले आहे.
संदेश श्रीकांत बांदेकर हे कारवारचे कोकणी चळवळीतील कार्यकर्ते. त्यांच्या अनेक कथा, कविता विविध कोकणी मासिके, दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. धारवाड आकाशवाणी केंद्रावरही त्यांचे कोकणी कार्यक्रम होतात.
गोव्यासारख्या सुशिक्षित राज्यात आजही हुंडा घेतला जातो. हुंड्याच्या नावाखाली फर्निचर, कपाट, दागदागिने, जेवणावळी, सभागृहाचा खर्चही घेतो. अर्थात काही कुटुंबे हा खर्च समप्रमाणात वाटून घेतात. या हुंडा प्रथेचा वापर करून लेखकाने आजच्या समाजव्यवस्थेला चांगले चिमटे काढले आहेत.
(लेखक साहित्यिक आहेत.)
-----------------------------------
बायल म्हागेल हुशार (नाटक)
लेखक : संदेश श्रीकांत बांदेकर
प्रकाशक : निर्माण प्रकाशन
पाने : १२०, किंमत : १५० रूपये