कॅसिनो आणि गोव्याचं अर्थकारण

अर्थरंग

Story: प्रवीण गावकर | 16th April 2018, 11:51 Hrs

गोवा गॅम्बलिंग अॅ्क्ट १९७६ च्या कायद्यानुसार कॅसिनो अधिकृतरीत्या गोव्यात सुरू झाले. सुरूवातीला ऑनशोर (जमिनीवर) कॅसिनो सुरू झाले आणि मग ऑफशोर (पाण्यात) कॅसिनो सुरू करण्यात आले. ऑनशोर कॅसिनोला तेवढी लोकप्रियता नव्हती आणि त्यामुळे त्याकडे फारसं लक्ष जात नव्हतं. साहाजिकच सगळं सुरळीत चाललं होतं. पण २००४ साली जेव्हा मांडवी नदीत कॅसिनो सुरू झाला तेव्हा जुगाराबरोबरच त्याला एक वेगळं ग्लॅमर आलं. खास बांधून घेतलेल्या बोटी, पंचतारांकित हॉटेलला साजेल अशी आंतरबाह्य सजावट, खास विजेची रोषणाई, आतलं वातानुकूल वातावरण, अत्याधुनिक रेस्टॉरंट्स, तिथे हजेरी लावणारे गर्भश्रीमंत लोक व सेलिब्रिटी या सर्व गोष्टींमुळे साहाजिकच सर्व लोकांचं लक्ष वेधलं जाऊ लागलं. हळुहळू मांडवी नदीत कॅसिनोच्या बोटी वाढू लागल्या. गोवा हे पर्यटन दृष्ट्या लोकप्रिय आहेच. पण त्याचबरोबर कॅसिनोमुळे एक वेगळा वर्ग गोव्याकडे आकर्षित होऊ लागला. ज्यांच्याकडे अमाप पैसा आणि वेळ होता असे लोक कॅसिनोंवर गर्दी करू लागले. विमानाने ये जा करणाऱ्यांची संख्या वाढली. खास करून शुक्रवार ते सोमवार विमानातून प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढायला लागली. विमान प्रवास तिकिटंही त्या दिवसात महाग व्हायला लागली. कॅसिनोच्या निमित्ताने गोव्यात हॉटेल व वाहतूक व्यवसायही जोरात चालू लागला. कॅसिनोमुळे बऱ्याच युवकांना नोकरीची संधीही उपलब्ध झाली. कॅसिनो म्हटल्यानंतर फक्त जुगारच नाही तर तिकिट बुकींग, रिसेप्शन, त्यातलं रेस्टॉरंट, करमणुकीचे कार्यक्रम, प्रवाशांना नेण्यासाठी छोट्या बोटी या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे गोव्यातल्या युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण मिळालं आणि नोकरीही मिळाली (याच प्रशिक्षणाच्या जोरावर गोव्यातील बऱ्याच युवकांना परदेशात खास करून क्रूझ बोटीवर नोकरी मिळाल्या आहेत). एकूण गोव्यातील युवकांना नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध झाली.
जुगार म्हटलं की पैसा आला आणि पैसा आला की त्याबरोबर वेगवेगळे प्रश्न आले. वास्तविक कायदेशीररीत्या सुरू केलेल्या या गॅम्बलिंग व्यवसायाला चांगले परिभाषित कायदे नसल्यामुळे त्रुटी निर्माण झाल्या. वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आवाज करून लक्ष वेधण्याचं साधन मिळालं. खास करून निवडणूक आणि विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान कॅसिनोविरूद्ध आवाज वाढू लागला व कोट्यवधी रूपये गुंतवून सुरू केलेल्या या व्यवसायात अस्थिरता यायला लागली. या गॅम्बलिंगमुळे गोव्याची संस्कृती व युवा पिढी बरबाद होते असा सूर लावणारे लोक/संस्थाही डोकं वर काढू लागले. तसं बघायला गेलं तर गोव्यात जागोजागी सुरू केलेली दारूची दुकाने व सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रग्सने गोव्याच्या युवा पिढीचा जास्त संहार केला आहे.
कॅसिनोचा वार्षिक कर व प्रवेश कराच्या निमित्ताने गोवा सरकारला भरपूर महसूल मिळत आहे. हा महसूल कोटींच्या घरात जातो. तसं बघायला गेलो तर खाण बंदी नंतर काही अंशी कॅसिनोंमुळे गोव्याची आर्थिक स्थिती सावरली गेली आहे. परंतु सध्याची कॅसिनोंची अवस्था अगदी दोलायमान झालेली आहे. तिची अवस्था सरकारने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीगत केलेली आहे. २००४ साली वार्षिक कर होतं १ कोटी रुपये जे आता सरकारने ४० कोटी रुपये केलेले आहे. म्हणजेच किती पटीने कराची वाढ केली आहे याचा आपण विचार करू शकतो. कॅसिनो चांगला की वाईट हा विषय वेगळा आहे. परंतु जेव्हा आपण कायदेशीररीत्या एखादी गोष्ट सुरू करतो तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करून सुनियोजितपणे सुरू करायला पाहिजे, जेणे करून त्या गोष्टीचा बाऊ करून लुटणाऱ्या लुटारूंना संधी देता कामा नये. आजच्या जमान्यात एखादा व्यवसाय सुरू करणं हे महाभयंकर दिव्य आहे. त्यामुळे अनेक दिव्याला सामोरं जाऊन व कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करून सुरू केलेल्या कॅसिनो मालकांचाही विचार व्हायला हवा. मला तर असं वाटतं की गोवाभर फोफावलेला व खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे चालणारा मटका व्यवसायसुद्धा गॅम्बलिंग अॅक्टनुसार (दुरूस्ती करून) कायदेशीर करायला पाहिजे, जेणेकरून लुटणाऱ्यांची तोंडं बंद होतील व सरकारला महसूल मिळेल.       

Top News

अनधिकृत बांधकामांच्या मुदतवाढीला मान्यता

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर अध्यादेश Read more

सरकारी नोकऱ्यांचा विषय तापला

खासगी उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा; ‘ना हरकत’ची अट अन्यायकारक Read more

उपनिरीक्षक रेडकर यांची बदली

मृताच्या मित्राला शिवीगाळ केल्याचे प्रकरण Read more

पेडण्यातील सहा शाळांत ‘स्मार्ट’ वर्ग

सामाजिक सेवा उपक्रमाअंतर्गत जीएमआरची योजना Read more

बारावीचा निकाल येत्या शनिवारी

एसएमएस, आयव्हीआरएसद्वारेही निकाल पाहण्याची सुविधा Read more