सैल जाहले एेसे, हे अनुबंध...

स्वच्छंद

Story: रमेश सावईकर | 12th April 2018, 05:20 Hrs


---
आज नात्यानात्यांमधील अनुबंध जिव्हाळायुक्त राहिलेले नाहीत. त्याला माणूस पूर्वअंशी जबाबदार नसेलही. तथापि काही अंशी तो याला जबाबदार आहे, हे नाकारता येणार नाही. बदलती परिस्थिती हे एक कारण म्हणता येईल. परंतु, परिस्थितीनुसार माणसाने स्वत: किती म्हणून बदलावं, स्वत:चं स्वभाव वैशिष्ट गमवावं अन् आपली तकलादू प्रतिमा नातेवाईक मंडळींत व समाजात निर्माण करण्याचा हव्यास धरावा, याला कुठेतरी मर्यादा हवी ना?
आज माणूस माणसाला भेटतो, ती मुळी ‘भेट’ असते असे वाटतही नाही. मित्र भेटला म्हणा किंवा दृष्टिभेट झाली तरी ‘हॅलो’ म्हणायलाही त्याला फुरसत नसते. लांबवरुनच तो हात उंचावून पुढं निघून जातो. खरोखरच वेळेची एवढी टंचाई आहे का? परवाचीच गोष्ट. जवळच्या नातेवाईकांपैकीच एक. काही कारणास्तव घरी आले. या बसा, पाणी हवं का? म्हणताच ‘फक्त साखर द्या, पाणी पिणं खूप झालंय!’ म्हणाले. चहा किंवा काॅफी तरी घ्या, असं पुटपुटण्याच्या तयारीत मी होता, पण त्याच्या बोलण्यानं माझे शब्द तोंडातच राहिले. क्षणभर मी अवाक झालो. अवघ्या पाच मिनिटात त्यांनी निरोप घेतला. त्यावेळी बरं तर, असं म्हणून त्याला निरोप देण्याशिवाय मी दुसरं काय करणार?
गोवा मुक्तीपूर्व व मुक्तीनंतरच्या २०-३० वर्षांचा कालखंड मला आठवला. माणसं नातेवाईक, मित्रमंडळींकडे मोठ्या आपुलकीने जायची. रहायची, त्यांच्या सुखदु:खात सहभागीच नव्हे, समरसही व्हायची. आपल्या नातेवाईकांकडे जावं. एखादं दिवशी तरी मुक्काम करावा. आपुलकीने मायेने विचारपूस करावी. त्यांची सुख-दु:खं जाणून घ्यावीत. त्यांना एखादी समस्या असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा द्यावा, असं मनापासून वाटणारी माणसंच आता दुर्मीळ झाली आहेत. जाणत्या मंडळींनी जपून ठेवलेली नातीगोती आज दुरावत चालली आहेत. नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया आदी भावनांचे अनुबंध सैल होत चालले आहेत.
३०-३५ वर्षापूर्वी वाहतुकीच्या सोयी फार कमी होत्या. स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकी गाड्या असणारी कुटुंबेही आजच्या तुलनेत फारच कमी होती. त्यावेळी कमी सोयी असूनही माणसं आपल्या माणसांकडे वरचेवर ये-जा करायची. सवड काढून वस्ती करायची. धार्मिक विधी, मंगलकार्याच्या पूर्वतयारीसाठी नातेवाईकांकडे चक्क आठवडाभर ‘तळ’ ठोकायची. एक वेगळंच मंगलमय वातावरण तयार व्हायचं. घरगुती पदार्थ तयार करण्यावर भर असायचा. ‘त्याचं लग्न ठरलंय’ असं कोणी सांगितल्यावर वधू किंवा वराकडील बायकामंडळींना ‘पापड, लोणची घातलीत का? हा ठरलेला प्रश्न विचारला जायचा, तो फक्त विचारण्यापुरताच नसायचा. तर ही माणसं त्याच्याकडे जाऊन पूर्वतयारीसाठी चक्क सक्रीय व्हायची. हे चित्र त्यावेळी पहायला मिळायचे. माणसं कशी नात्याच्या अनुबंधांनी एकमेकांशी घट्ट बांधलेली असायची. या साऱ्या गोष्टी स्मृती पटलावरुन पुढे सरकून जातात. त्यावेळी आजची परिस्थिती कशी व किती बदलत चालली आहे, याचा विचार मन करू लागतं. खंत आहे, नात्यांचे अनुबंध सैल होत आहेत, याची!
आज कुटुंबांमध्ये आजी-आजोबा, काका-काकी राहिलेले नाहीत. एकत्र कुटुंब पद्धत गेली नि विभक्त कुटुुुंबे आली. तिचेच समाजात वर्चस्व आहे. एैसपैस जागेची घरे जाऊन ‘फ्लॅट’ संस्कृतीने डोके वर काढले आहे. पूर्वी घरातील माणसे कुटूंबाला तडा जाणार नाही, याची खबरदारी घ्यायची. अंतर्गत धुसफूस, मतभेद असेल तरी त्यांचे स्वरुप तात्पुरते असायचे.
आज विभक्त कुटुंबेही एवढी विस्कळीत ‘व्य(अ)वस्थे’ ची बनली आहेत की आईवडील वृद्ध झाले की वृद्धाश्रमाला रस्ता धरण्याची त्यांच्यावर पाळी येते. मुलांसाठी देह झिजवतात, त्यांच्यावर स्वत:ची घरे सोडून वृद्धाश्रमात उर्वरित जीवन कंठण्याची पाळी यावी, हे दुर्दैव. ती गंभीर सामाजिक समस्याही बनली आहे.
हे असे घडू नये म्हणूनही कित्येक गोष्टी करण्यासारख्या आहेत. बदलत्या काळानुरूप परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता नव्या पिढीमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांना समुपदेशनाची गरज आहे. माणसं आपोआप घडत नसतात. त्यांना घडवावे लागते. हा वस्तुपाठ पूर्वी कुटुंबामध्ये महत्त्वपूर्ण मानला जायचा. काही चांगल्या गोष्टी मुलांमध्ये अंगभूत होण्यासाठी शिस्त ही महत्त्वाची आहे. याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष होत नाही. समजते पण उमजत नाही, ही समाजमनाची समस्या आहे. बरं, वाईट काय, याचं ज्ञान नसण्याएवढा समाज निर्बुद्ध राहिलेला नाही. सारं समजतं, उमजतं पण लक्षात कोण घेतं? कोणी घ्यावं? हाच खरा प्रश्न आहे.
कुटुंबातील बेशिस्त फक्त कुटुंबापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तिने समाजव्यवस्था पूर्णपणे व्यापली आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात खरी नाणी कालबाह्य ठरून खोट्या नाण्यांची चलती झाली आहे. अधर्माच्या भिंती बांधून त्यावरती दुष्कृत्यांचे कळस चढविले जात आहेत. कुटूंबातील नात्यांनी स्नेहसंबंधांचे अनुबंध घट्ट झाले तरच अनेक कुटुंबांनी घडलेल्या समाजाचे माणुसकीचे अनुबंध उजळले जातील. स्वार्थ, लोभ, आपमतलबीपणाच्या स्पर्धेत माणूस माणुसकी हरवतोय. माणूस माणसापासून दुरावतोय. हे दुरावे दूर व्हावेत, असे मनोमनी वाटणं गरजेचं आहे. त्यासाठी मानवतेच्या धार्मिक भावनांचे अनुबंध सैल न होता अधिक घट्ट व्हायला हवेत!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more