अलौकिक बुद्धिमत्तेचा नेता

Story: संजय नाईक | 12th April 2018, 05:19 Hrs


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे दीनदुबळ्यांची अस्मिता जागवणारे पहिले महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदे पंडित... अनेक बिरुदावल्या त्यांना लाभल्या. या युगप्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगाव तालुक्यातील ‘अांबवडे’ हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ सैन्यात सुभेदार-मेजर या पदावर होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाॅ. अांबेडकर यांनी समाजकार्याला सुरुवात केली. ३१ जानेवारी १९२० मध्ये ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी भाग घेतला. अस्पृश्यांमध्ये जागृती घडवून अाणण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी १९३४ ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. तसेच ‘बहिष्कृत भारत’ हे साप्ताहिक सुरु केले. १९४६ मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. तिच्याच वतीने मुंबईत ‘सिद्धार्थ काॅलेज’ व अौरंगाबादला ‘मिलींद महाविद्यालय’ सुरु केले. दलित विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे सुरु केलीत.
जातिभेद नष्ट व्हावा, समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी १९२७ साली ‘समाज समता संघ’ स्थापन केला. या संघातर्फे ‘समता’ हे अाणखी एक वृत्तपत्र सुरु केले. १९२७ मध्ये बाबासाहेबांची मुंबई विधीमंडळावर निवड झाली.
महाड येथील तळ्याचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना मज्जाव होता. तेव्हा अांबेडकरांनी २० मार्च १९२८ रोजी सत्याग्रह करून त्या तळ्याच्या पाण्यावर अस्पृश्यांचाही हक्क अाहे, याची सर्वांना जाणीव करून दिली. सामाजिक भेदभाव अाणि उच्च नीच भेदभाव याचे समर्थन करणाऱ्या ग्रंथांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी अांबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. उच्च वर्णियांनी अस्पृश्यांना नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश नाकारला होता. या विरुद्ध डाॅ. अांबेडकरांनी २ मार्च १९३० रोजी सत्याग्रह केला.
डॉ. आंबेडकर यांना वाचन व लेखनाचा छंद होता. त्यासाठी त्यांनी घरातच एक ग्रंथालय उभारले. यात ५०,००० ग्रंथ होते. त्यांनी स्वत: ५८ पुस्तके वा ग्रंथ लिहिलेले आहेत. तसेच पाच वृत्तपत्रेही सुरू केली होती. बाबासाहेबांनी तयार केलेले हिंदू कोड बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी मांडले. परंतु, अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, गृहमंत्री वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य असलेले मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला जोरदार विरोध केला.
१९५६ मधील उत्तरार्धातील घटना. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती त्यांनी रात्री तपासल्या. ६ डिसेंबर १९५६ रोजी रात्री १२.१५ वाजता दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे होते. मुंबई हे ठिकाण अंत्यविधीसाठी निश्चित झाले. त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. लाखोंच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
(लेखक विविध विषयांचे व्यासंगी आहेत.)

Top News

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more