मोदींचा गुजरात

हॅलो जिंदगी

Story: भारती पावसकर |
07th April 2018, 05:09 am


मागचा आठवडा मोदींच्या गुजरातमध्ये गेला. यावेळी सोरठी सोमनाथ ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश धाम, नागेश्वर ज्योतिर्लिंग, बेट द्वारका, गिरनारचा पायथा, स्वामीनारायण मंदिर यात्रा यादीवर होतं. छोटेखानी सफर. पण लांबच्या लांब हमरस्ते, शहरं आणि तालुक्याच्या गावांतून जाणारे राजमार्ग सारं काही पालथं घातलं. पण एकंदर अनुभव इतका सुखद होता की आपण भर उन्हाळ्यात वाहनानं रस्त्यावरून प्रवास करत आहोत, असं कुठंच नाही जाणवलं. मोठाले, गुळगुळीत, सरळ. खाचखळगे, खड्डे नाहीत, वळणंही नाहीत. गुजरात राज्यातच हजार-बाराशे किलोमीटरचा प्रवास टॅक्सीनं झाला पण जराही थकवा नाही. फक्त राष्ट्रीय महामार्गावरून काय तो येण्याजाण्याचा टोल वसूल केला जायचा. राज्यातले रस्ते टोल फ्री.
गुजरातचा विकास डोळ्यांनी दिसला. विकासाच्या महामार्गावरून रिलायंस सिटी, एस्सार रिफायनरी, टाटा नमकचं शहर मागे टाकत आमची टॅक्सी द्वारकेच्या दिशेनं पळत होती. चालक पक्का मोदीभक्त दिसला. अर्थात तो खरोखरच कुणी सच्चा मोदीभक्त होता की विकासाचं वारेमाप वारं अंगावर आल्यामुळं सुखावलेला एक सर्वसाधारण नागरिक होता कुणास ठाऊक, पण तो म्हणत होता त्यात मात्र शंभर टक्के तथ्य आहे हे पावलागणिक, मैलागणिक पटत होतं. गाडी धावत होती ऐंशीच्या गतीनं. पण गुजरातेत विकासाची गती, मात्र नव्वदच्या पुढंच असावी.
दहा-बारा वर्षांपूर्वी भेट दिली होती तेव्हाचं राजकोट आणि आताचं राजकोट यात फरक होता. जुन्या शहरानं कात टाकली होती. नवं बऱ्यापैकी वसलेलं दिसलं. पूर्वी पाण्याचं दुर्भिक्ष असलेली ही नगरी आता चोवीस तास पाण्यात न्हात होती. वीज जाण्याचे प्रकार फार कमी. जास्त वेळेसाठी वीज जायची असेल तर मोबाईलवरून संदेश येतो. राज्याचा मुख्यमंत्री इथलाच, राजकोटचा. सामान्य नागरिकांकडे लक्ष द्या, त्यांच्या अडचणी प्राथमिकतेनं दूर करा असा मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र नव्हे आदेशच असल्यानं राजकोटच काय, आसपासची शहरं बऱ्यापैकी सुधारलीत. आता सरकारी कार्यालयांतून लाचलुचपत, भ्रष्टाचार करायला फारसे कुणी धजावत नाही. जगणं सुसह्य झालंय, असा दावाही चालकानं केला.
रिलायन्स सिटीजवळून जातांना तर त्यानं आतल्या सुखसोयींचं गुणगानच गायलं. बाहेरूनच आतल्या झगमगाटाचा अंदाज आला. अंबानीच्या लहानग्या गावापासनंही आम्ही गेलो. धीरूभाईंचं मूळ घर अजूनही इथं आहे. या गावाचा आता कायापालट झालाय. टाटा नमक उत्पादन जिथनं होतं ते गावही वाटेत लागलं. टाटांनीच वसवलंय. सारे गाववाले मिठागरं चालवतात. मीठ कंपनी विकत घेते. त्यावर प्रक्रिया करणारे कारखानेही दिसले. पुढं पवनचक्क्यांची रांगच्या रांग लागली. या साऱ्या खासगी पवनचक्क्या. त्यातल्या काही तर अमिताभ बच्चनच्याही मालकीच्या आहेत. एकेक कोटीच्या वर असते एक पवनचक्की. त्यातून निर्माण झालेली वीज खासगी कंपन्या सरकारला विकतात, वा अदलाबदली करतात, म्हणजे इथली वीज सरकारला विकत देत आपले कारखाने जिथं कुठं आहेत तिथं कमी दरात सरकारी वीजवापर करतात. पवनचक्क्यांतून निर्माण झालेली सारी वीज मोठाल्या ग्रीड व केबलमार्फत वाहिली जाते. या केबल खूप उंचावरून नेल्या जातात, कारण विजेचा दाब इतका प्रचंड असतो की माणसं, जनावरं खेचली जाण्याची ताकद या वायरमध्ये असते...
पुढंच एक गावच केवळ कल्पवृक्षांनी भरलेलं. हिरवंगार. माडांची बागातयच जणू. आपल्या गोव्यात माड खूप. पण ते क्रमानं लावलेले नसतात. मिळेल तिथं उगवलेले दिसतात - नदीकाठी, समुद्रकिनाऱ्यावर, शेतांच्या बांधावर, परसात. पण इथं तसं नव्हतं. सारे व्यवस्थित, एका मापाचे, एका उंचीचे, एका वयाचे माड. शिस्तीत, रांगेनं उभे. माडांची शेतंच्या शेतं. मैलोनमैल माडच माड. पाण्याचा वापर काटेकोर. जुने फळांनी लडबडलेले. नव्यानं लावलेले कोवळे माड आकाशाकडे झेपावत होते. रस्त्याच्या कडेला फक्त दहा-बारा रूपयांना आडसरं विकणारेही होते. साऱ्या गुजरातेत आडसरं व नारळ इथूनच जातात म्हणे. उन्हं डोक्यावर आलेली. आम्हीही वाहन थांबवून तहान शमवली. चवदार गोड पाणी, मलईदार खोबऱ्याची चव जिभेवर रेंगाळत ठेवून पुढची वाट धरली. अजून एकदा यायला हवं, उरलेलं पाहायला, अनुभवायला हे राजकोट सोडलं तेव्हाच पक्कं केलं.