केवळ इच्छाशक्ती!

वाचु आनंदे

Story: महेश महादेव दिवेकर |
07th April 2018, 05:08 am
केवळ इच्छाशक्ती!


माणूस मानसिक शक्तीच्या बळावर कोणतेही दिव्य करू शकतो, हे सिद्ध झाले आहे. आजारी पडल्यास वा कसलाही मानसिक आघात झाल्यास त्यातून सावरण्याची शक्ती माणसामध्येच असते. डाॅ. बर्नी एस. सिगल हेच सांगतात. त्यांच्या ‘पीस, लव्ह अँड हीलिंग’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. हे मूळ इंग्रजी पुस्तक १० वर्षांपूर्वी (मे १९८९) प्रकाशित झाले होते. अनुवादक आहेत, पूर्णिमा कुंडेटकर.
मन, बुद्धी व शरीर यांचा एकमेकांशी संबंंध असतो. वैद्यक शास्त्राने हे स्वीकारले आहे. मानसिक, सामाजिक घटक, माणसाची प्रतिकार शक्ती व वृत्ती यांचा एकमेकांशी संबंध असतो. त्याविषयी डाॅ. सिगल यांनी संशोधन केले आहे. प्रेमभावना व मन:शांती आपले संरक्षण करतात. त्यामुळे अनेक समस्यांना आपण लीलया सामोरे जाऊ शकतो. वादळवारे आले तरी त्यात टिकून कसे रहावे, हे शरीरातील घटकच आपल्याला शिकवतात. जिद्द, आत्मविश्वासाने मग नवा उत्साह, जोम येतो. डाॅ. सीगल यांनी पुस्तकात हे चांगल्या पद्धतीने मांडले आहे.
माणूस आजारी पडतो. दुर्धर रोगांना बळी पडतो. जेव्हा हे त्याला कळते, तेव्हा तो साहजिकच खचून जातो. पण त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर योग्य औषधोपचारांनंतर तो ठीक होऊ शकतो. कारण सिगल यांच्या मते प्रत्येकाच्या अंगात स्वत:ला बरे करण्याची एक सुप्त शक्ती दडलेली असते. गंमत म्हणजे सिगल यांचा हा दावा वैद्यकीय क्षेत्रानेही स्वीकारला आहे.
डाॅ. सिगल हे ८५ वर्षांचे अमेरिकन लेखक, निवृत्त पॅडियाट्रिक सर्जन. आजारातून ठीक होण्याची प्रक्रिया आणि रुग्ण यांच्यातील संबंधांवर ते लिहितात. अनेक उदाहरणे देऊन. ‘लव्ह, मेडिसीन अँड मिरॅकल’ हे त्यांचे लोकप्रिय पुस्तक.
सिगल या पुस्तकात म्हणतात, मृत्यू टाळण्यासाठी माझा सल्ला घेऊ नका. तर जीवन आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तो पाळा. कर्करोग वा इतर गंभीर आजारांना आपण बळी पडतो, त्यामागे अर्थात पर्यावरण व आपले जीन्स महत्त्वाची भूमिका बजावतात हे खरे. आमच्या शरीरात आपण जे भावनिक वातावरण निर्माण करतो, ते अशी काही यंत्रणा तयार करते की आपण कुठल्याही आजारातून वाचू शकतो किंवा याच्या उलटही होऊ शकते. त्यामुळे एकाच वेळी जन्मलेले जुळेही एकाचवेळी एकाच आजाराला बळी पडत नाही. सिगल म्हणतात, माणसाने सदैव आनंदी राहिले पाहिजे. त्यासाठी नको त्या गोष्टी करायलाच हव्यात असे काही नाही. साध्या गोष्टींतूनही आपण आनंद घेऊ शकतो.
या पुस्तकात आपल्या क्लिनिकमध्ये आलेल्या अनेक व्यक्तींची डाॅ. सिगल यांनी उदाहरणे दिली आहेत. त्याद्वारे ते मुद्दा पटवून देतात. यात आपली विचारसरणी, जिद्द, आत्मविश्वास, मेहनत, शिस्त आणि हो योगायोगही, आपल्याला आजारातून कसे ठीक करू शकतात, यावर लेखकाने भाष्य केले आहे.
त्यांनी प्रस्तावना रुपात छान उपदेश केला आहे. प्रेम, आनंद, सकारात्मकता आपले शरीर कसे बदलू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्या रुग्णांना ते पाच प्रश्न विचारतात आणि त्यातून त्याच्या स्वभाव व आजाराविषयीची माहिती घेतात. एक हटके असे हे पुस्तक आहे.
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे सहसंपादक (पुरवणी) आहेत.)
--------
पीस, लव्ह अँड हीलिंग
ले : डाॅ. बर्नी एस. सिगल
अनु.: पूर्णिमा कुंडेटकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, [email protected]
किंमत : ३२० रुपये, पाने ३१२