पोटनिवडणूक प्रचारासाठी घरोघर प्रचार, कोपरा सभा, सोशल मीडियाचाही वापर

कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लक्ष्य


13th August 2017, 03:25 am
पोटनिवडणूक प्रचारासाठी घरोघर प्रचार, कोपरा सभा, सोशल मीडियाचाही वापरप्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रचाराला हळूहळू गती मिळू लागली आहे. भाजप, कॉँग्रेस आणि गोसुमंच्या उमेदवारांनी कोपरा सभा आणि घरोघर जाऊन प्रचारावर भर दिला आहे. तसेच सोशल मीडियाचाही प्रचारासाठी पुरेपूर वापर केला जात आहे.
२३ अॉगस्टला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कॉँग्रेसचे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार आनंद शिरोडकर आणि अपक्ष केनेथ डिसिल्वा निवडणूक रिंगणात आहेत. मुख्यमंत्री तथा भाजपचे उमेदवार पर्रीकर यांनी कोपरा बैठकांवर भर दिला आहे. मतदारसंघातील इमारत संकुले, वसाहतीमध्ये नागरिकांना एकत्र जमवून त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत. मतदारसंघात सर्व ठिकाणी घराघरात जाऊन प्रचार करणे शक्य नसल्याने कोपरा सभांवर भर दिला जात आहे. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. कॉँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर यांनी प्रचाराला गती दिली आहे. चोडणकर यांनी रायबंदर भागात पहिली फेरी पूर्ण केली आहे. आता मुख्य शहर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पर्रीकर यांच्या अपयशाचा पाढा मतदारांसमोर मांडला जात आहे. कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून पत्रकार परिषदांतून पर्रीकर यांच्यावर टीका केली जात आहे.
गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून, गोसुमंचे कार्यकर्तेसुद्धा मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रचाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा भाजपचे उमेदवार पर्रीकर यांना लक्ष केले जात आहे.
निवडणुकीला सामोरे जाणारे दुसरे मुख्यमंत्री
मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणारे मनोहर पर्रीकर हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी, पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर निवडणुकीला सामोरे गेले होते. मगो पक्षाचे मडकईचे आमदार वसंत वेलिंगकर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन बांदोडकर यांच्यासाठी मतदारसंघ सोडला होता. या पोटनिवडणुकीत भाऊसाहेब प्रचंड मतांनी निवडून आले होते. मनोहर पर्रीकर यांच्यासाठी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पर्रीकर यांना पोटनिवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न चालविला आहे.
---
प्रचारासाठी दिल्लीतील नेत्यांची
आवश्यकता नाही : पर्रीकर
५५ टक्के प्रचार पूर्ण
विशेष प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांची आवश्यकता नाही, आमचा प्रचार ५५ टक्के पूर्ण झाला आहे. १५ ऑगस्टपर्यंत पहिली फेरी संपवून आपण प्रचारासाठी १९ आणि २० ऑगस्ट असे दोन दिवस वाळपईला जाईन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
पणजीत आतापर्यंत ५५ टक्के प्रचार पू्र्ण झाला आहे. सुमारे ७ ते ८ हजार कुटुंबे पणजीत राहतात. ठिकठिकाणी कुटुंबांच्या एकत्रित भेटी घेण्याचे माझे काम सुरू आहे. मी बहुतांश लोकांना ओळखत असल्यामुळे मला प्रचार सोपा होतो, असे पर्रीकर म्हणाले.
मी प्रत्येक कॉलनीत जातो तिथे लोक आपापल्या शेजारच्या मतदारांना एकत्र बोलावतात, तिथे मी त्यांच्याशी संवाद साधतो. माझ्या प्रचाराची पहिली फेरी १५ तारखेपर्यंत संपेल. त्यानंतर १६ आणि १७ असे दोन दिवस मी उर्वरित काही ठिकाणी भेटी देईन आणि १९ व २० रोजी वाळपई मतदारसंघात प्रचाराला जाईन, असे पर्रीकर यांनी सांगितले.
मिरामार येथे रुतलेल्या लकी सेव्हन जहाजाविषयी पणजीत मला कोणीच प्रश्न विचारलेला नाही. फक्त मीडियाच याविषयी विचारत असते. पण हे जहाज काढले जाईल, सरकारला ते जहाज काढण्याची चिंता आहे असे पर्रीकर म्हणाले.