९९० कोटींचे पुरवणी पॅकेज

नव्या विकासकामांसाठी १० मंत्र्यांच्या ५० खात्यांना नवी आर्थिक तरतूद; मलनिस्सारण, फ्लोरिकल्चर इस्टेट, आयटी क्षेत्रात नवे प्रकल्प

Story: पांडुरंग गावकर |
13th August 2017, 03:19 am
पणजी : फुलशेती वसाहत, मलनिस्सारण, जलस्रोत, आयटी पार्क अशा वेगवेगळ्या नव्या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी १० मंत्र्यांच्या खात्यांसाठी आणखी ९९० कोटी रुपयांचे पुरवणी बजेट दिले आहे. १६ हजार कोटींच्या अर्थसंकल्पीय मागण्यांसह ९९० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या असून, मंत्र्यांना आपापल्या खात्यामार्फत राबवायच्या नव्या प्रकल्पांसाठी ही तरतूद आहे.
९९० कोटी रुपयांपैकी सर्वाधिक जास्त रक्कम सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या खात्यांना मिळाली आहे. २९७ कोटी रुपये ढवळीकर यांना अतिरिक्त मिळाले आहेत. राज्यात नव्या मलनिस्सारण प्रकल्पांसाठी ही तरतूद आहे. त्यांच्याकडील खात्यांचे एकूण बजेट २,५५२ कोटी रुपये झाले आहे. नव्या तरतुदीमुळे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या खात्यांच्या बजेटला ढवळीकरांनी मागे टाकले आहे.
मंत्र्यांमध्ये ढवळीकर यांच्यापाठोपाठ सर्वाधिक बजेटची खाती असलेल्यांमध्ये वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांचा समावेश आहे. त्यांचे पूर्वीचे दोन खात्यांचे बजेट २,४५६ कोटी रुपये होते, त्यांना आता वीज खात्यासाठी आणखी ५४ कोटी रुपये मिळाले आहेत.
वेगवेगळ्या सुमारे ५० खात्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी ९९० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या आहेत. त्यात ९ मंत्र्यांकडील १५ खात्यांसाठी ७४६ कोटी रुपयांचा समावेश आहे. इतर खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्या सर्व खात्यांसाठी एकूण सुमारे २४४ कोटी रुपये अतिरिक्त मिळाले आहेत. शिक्षण खात्यासाठी ६८, तर उच्च शिक्षणासाठी ३८ कोटी रुपयांचा यात समावेश आहे.
९९० कोटी रुपयांमधून मोठी रक्कम मिळालेल्यांमध्ये नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, क्रीडामंत्री बाबू आजगावकर, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांचा समावेश आहे. डिसोझा यांच्याकडील नगरविकास खात्यासाठी आणखी ११५ कोटी रुपये मिळाले आहेत.
पुरवणी बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जी तरतूद केली आहे त्यातून राज्यात स्वच्छता आणि मलनिस्सारणाचे प्रकल्प राबवले जातील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
नव्या आर्थिक तरतुदीमध्ये ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर आणि आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांच्या खात्यासाठी तरतूद नाही.
मंत्री अतिरिक्त बजेट
सुदिन ढवळीकर - सार्वजनिक बांधकाम मंत्री २९८ कोटी
फ्रान्सिस डिसोझा - नगरविकासमंत्री १२३ कोटी
बाबू आजगावकर- पर्यटनमंत्री ७९ कोटी
पांडुरंग मडकईकर- वीजमंत्री ५४ कोटी
विनोद पालयेकर - जलस्रोतमंत्री ५२ कोटी
मॉविन गुदिन्हो -पंचायतमंत्री ३६ कोटी
रोहन खंवटे - महसूलमंत्री २६ कोटी
विजय सरदेसाई- नगर नियोजनमंत्री २१ कोटी
----------
 फातोर्डा मतदारसंघातील जुन्या मार्केट परिसरातील गोवा टिंटो प्रकल्प, होलसेल मच्छी मार्केट असे प्रकल्प येणार आहेत त्यासाठी निधीची तरतूद केली आहे.
 जलस्रोत खात्यामार्फत ‘आमची बांय'सारखे विहीर जतन करण्याचे काम हाती घेतले जाईल, त्यासाठी आणि अन्य कामांसाठी ५० कोटींची तरतूद केली आहे. क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रात काही नव्या योजना हाती घेण्याचे ठरले आहे त्यासाठीही तरतूद केली आहे. दरम्यान, आयटी पार्क आणि नगर विकास खात्याच्या नव्या योजनांसाठीही खास तरतूद केली आहे.
सेंटर फॉर एक्सलन्स प्रकल्प सुरू करणार
कृषी खात्याामार्फत फ्लोरिकल्चर इस्टेट विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यासाठीही आर्थिक तरतूद केली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.