रवी, आलेक्स, गिरीश, यतीश अध्यक्षपदाच्या शर्यतीत

शांताराम नाईक यांचा राजीनामा


20th March 2018, 08:56 am

विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता 
पणजी : माजी खासदार शांताराम नाईक यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व फोंड्याचे आमदार रवी नाईक, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर व काँग्रेसचे प्रवक्ते आणि कायदा विभागाचे प्रमुख यतीश नाईक यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. दिल्लीतूनच पक्षाचा नवा प्रदेशाध्यक्ष जाहीर होईल. 
दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनानंतर शांताराम नाईक यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला. त्यांनी आपले राजीनामा पत्र दिल्लीत काँग्रेस अध्यक्षांना पाठवले आहे. 
मी आज अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात पक्षाच्या प्रमुखपदाची सूत्रे आता कोणाकडे द्यायची त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे शांताराम नाईक यांनी सांगितले. 
दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काँग्रेसमधील एक गट रवी नाईक यांच्याकडे अध्यक्षपद देण्यासाठी आग्रही आहे. दुसरा गट आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासाठी आग्रही आहे. आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा एक गट गिरीश चोडणकर यांच्याकडे अध्यक्षपद यावे यासाठी प्रयत्न करत आहे. पण राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा युवा नेतृत्वाकडे देण्याचे निश्चित केल्यामुळे रवी नाईक यांचे नाव आता मागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेजिनाल्ड, गिरीश किंवा यतीश यांच्यापैकी एकाला गोव्यात पक्ष नेतृत्वाची संधी मिळू शकते. 
२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येऊनही पक्षाला सत्ता स्थापन करणे शक्य झाले नाही. काही महिन्यांनंतर सांताक्रुझचे माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदला, आपण सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेऊ असे पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते. पक्षाने त्वरित लुईझीन फालेरो यांना बदलून त्यांच्याजागी शांताराम नाईक यांना आणले होते. पण त्यानंतरही पक्षाचे सरकार स्थापन झाले नाही. आता काँग्रेस बाहेरील राजकीय नेत्यांच्या कटकारस्थानांना बळी पडायचे नाही, अशा मतापर्यंत काँग्रेसचे नेते आले आहेत. त्यासाठी रवी नाईक किंवा गिरीश चोडणकर यांच्याकडे अध्यक्षपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. 
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विरोधक म्हणून कायम जबाबदारी सांभाळल्यामुळे त्यांच्या नावावरही गंभीरपणे पक्ष विचार करत आहे. पक्षातील युवा नेते अॅड. यतीश नाईक हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. पक्षाची धुरा एखाद्या युवा नेत्याकडे यावी असे पक्षातील बहुतांश नेत्यांचे म्हणणे असल्याने गिरीश, आलेक्स रेजिनाल्ड किंवा यतीश यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

हेही वाचा