सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली उपसमिती

ग्रेटर पणजी पीडीए; मागण्या ऐकून लवकरच निर्णय


20th March 2018, 03:25 am

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : ग्रेटर पणजी पीडीएमध्ये समावेश केल्यामुळे सांताक्रुझ, कुडका, चिंबल, शिरदोण, बांबोळी व आजोशी-मंडूर परिसरातील स्थानिकांनी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मागण्या ऐकून पुढील निर्णय घेण्यासाठी नगर नियोजन मंडळाने सोमवारी आयोजित बैठकीत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांची उपसमिती स्थापन केली.

समितीत आमदार फिलीप नेरी रॉड्रीगीश, मुख्य नगर नियोजक राजेश नाईक व पीडीएचे सदस्य सचिव आर. के. पंडिता यांचा समावेश आहे. ग्रेटर पणजी बाह्य विकास प्राधिकरणात तिसवाडीतील काही गावांच्या समावेशाला आक्षेप असल्यामुळे ग्रेटर पणजी पीडीएनेही अजून ताळगाव वगळता इतर भागांवर निर्णय घेतलेला नाही. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनीच पीडीएला इतर परिसराच्या बाबतीत सध्या काही निर्णय घ्यायचा नाही, असे निर्देश दिले होते. 

दरम्यान, या उपसमितीची पहिली बैठक बुधवारी (२१ मार्च) होणार आहे. त्यानंतर समिती आंदोलन करणाऱ्या आणि पीडीएला आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेईल. पुढील आठ ते दहा दिवसांत हा विषय निकालात काढावा, असे उपसमितीने तत्त्वत: ठरविले आहे. ग्रेटर पणजी पीडीएला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी ६ एप्रिल रोजी पणजीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत उपसमिती स्थापन करण्यासह वाहतूक खात्याच्या एका प्रस्तावावरही निर्णय झाला.

पावसाचे पाणी साठविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

राज्यात येणाऱ्या मोठ्या गृह प्रकल्पांना पावसाचे पाणी साठविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय नगर नियोजन मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. १० एप्रिलपर्यंत ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. गोव्यात अनेक मोठे गृहनिर्माण प्रकल्प येतात, पण पावसाचे पाणी साठविण्याचे प्रकल्प राबविले जात नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी समुद्राला मिळते. त्यामुळे पावसाचे पाणी साठविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात असल्याचे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.