आयसीसी टी-२० क्रमवारीत युजवेंद्र चहल दुसऱ्या स्थानी


20th March 2018, 03:54 am

दुबई :

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने दुसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेही या क्रमवारीत भरारी घेतली आहे. कोलंबोत रविवारी झालेल्या निधास चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे.

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील गोलंदाजांच्या विभागात चहलने १२ स्थानांची कमाई करून त्याने दुसऱ्या स्थानाला गवसणी घातली आहेत. या क्रमवारीत त्याचे हे सर्वोत्तम स्थान आहे.

वॉशिंग्टन सुंदरने तर या क्रमवारीत सर्वांत मोठी झेप घेतली आहे. सुंदरने १५१ स्थानांची भरारी घेत थेट ३१वे स्थान पटकावले आहे. यावेळी चहलच्या खात्यात ७०६ आणि सुंदरच्या खात्यात ४९६ गुण आहेत.

भारताच्या या दोन्ही फिरकीपटूंनी स्पर्धेतील पाचही सामन्यांमध्ये गोलंदाजी केली. या दोघांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रत्येकी आठ बळी मिळवले. सुंदरने जास्तीत जास्त षटके ‘पॉवर प्ले’मध्ये टाकली, पण तरीही त्याने चहलपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. भारताचे वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर यांनी अनुक्रमे ५२ आणि ७६वे स्थान पटकावले आहे.

दिनेश कार्तिक ९५ व्या स्थानी

निधास चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत दिनेश कार्तिकने अतुलनीय अशीच कामगिरी केली आहे. दिनेशलाही क्रमवारीत चांगलीच बढती मिळाली आहे. दिनेशने क्रमवारीत १२६ स्थानांची कमाई करत ९५वे स्थान पटकावले आहे.