भक्ती कुलकर्णीचे व्हिएतनाममध्ये यश

एच. डी. बँक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दुसरे स्थान


20th March 2018, 03:52 am

व्हिएतनाम :

गोव्याची वूमन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी हिने हनोई - व्हिएतनाममध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. भक्तीने हनोही येथे झालेल्या एच. डी. बँक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चीनची जागतिक रॅपिड उपविजेती ली टिंगजी हिच्यासह संयुक्त दुसरा क्रमांक पटकावला. माजी जागतिक ज्युनियर विजेती कजाकस्तानची डिनारा सादुकास्सोवा हिने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.भक्तीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून ४२ एलो रेटिंग गुणांची कमाई केली. तिला या स्पर्धेचे २००० डॉलरचे बक्षीस प्राप्त झाले. गोवा कार्बन लिमिटेडची ‘सदिच्छा दूत’ असलेली भक्ती ही या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या जगभरातील खेळाडूत १४ वे मानांकन प्राप्त बुद्धिबळपटू आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भक्तीचे स्वप्न पूर्ण झाले. तिला चीनच्या सुपरस्टार ली टिंगजीच्या बरोबरीने बक्षीस मिळाले. दिग्गज जीएम दाओ थिएन हिच्याविरुद्ध खेळताना तिने आक्रमक खेळ करून त्या दिवसाच्या खेळावर आपला ठसा उमटवला. भक्तीआता भव्य दुबई कप आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दुबईला जाणार आहे. गेल्या वर्षी दुबईत तिने सर्वोत्तम महिला खेळाडू पारितोषिक पटकावले होते.