आंदोलनाचा विमान उड्डाणांवरही परिणाम

अनेक उड्डाणे विलंबाने; प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत


20th March 2018, 01:52 am
आंदोलनाचा विमान उड्डाणांवरही परिणाम

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

वास्को : पणजीतील आंदोलनामुळे दाबोळी विमानतळावर अनेक प्रवासी वेळेवर न पोहोचल्यामुळे अनेकांची विमाने चुकली. काहीजणांना इतर विमानांनी इच्छितस्थळी पाठविण्यात आले, तर काहींना तिकिटांची रक्कम परत करण्यात आली.

इंग्लंडला जाणा‌ऱ्या ‘व्हितारा युके ८८४’ची वेळ दुपारी २.२० वा. आहे. या विमानातून प्रवास करणारे अनेक प्रवासी विमानतळावर वेळेवर पोहोचले नाहीत. तीच परिस्थिती ‘क्यूडब्ल्यू ६२७’ या विमान प्रवाशांचीही झाली. सुमारे २१ प्रवासी वेळेत पोहोचू शकले नाहीत. काहींना पुढील विमानाने पाठविण्यात आले, तर काहींना तिकिटाची रक्कम परत केली. ‘एअर इंडिया ६६४’ या सायं. ३.४५ वाजता मुंबईला जाणा‌ऱ्या विमानाला २५ मिनिटे विलंब झाला. ‘आय ५-७७६’ हे दुपारी ३.१५ वाजता नवी दिल्लीकडे उड्डाण करणार होते. काही प्रवाशांना हे विमान चुकल्याने त्यांना दुस‌ऱ्या विमानाने पाठविण्यात आले.

‘एसजी १७२’ या दिल्लीकडे जाणा‌ऱ्या विमानाने ३५ मिनिटे विलंबाने उड्डाण केले. ‘एसजी ४५४’ या मुंबईला जाणा‌ऱ्या विमानाने ३२ मिनिटे विलंबाने उड्डाण केले. तसेच एसजी ५१७ व ३१०६ च्या प्रवाशांना वेळेवर पोहोचता आले नाही. इंडिगो एअरलाईनच्या ८१३ या मुंबईला जाणा‌ऱ्या विमानातील २८ प्रवाशांना, ३८१ या हैद्राबादला जाणा‌ऱ्या विमानातील २३ प्रवाशांना, मुंबईला जाणा‌ऱ्या ७१२ क्रमांकाच्या विमानातील ६३, कोलकोताला जाणा‌ऱ्या विमानातील ३७ प्रवाशी, दिल्लीला जाणा‌ऱ्या ३३२ क्रमांकाच्या विमानातील ५० प्रवाशांना या आंदोनलनाचा फटका बसला. ही सर्व विमाने २० ते २५ मिनिटे उशिरांनी उड्डाण केले.