आंतरराज्य बस वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

पर्यटक, नोकरदारांची गैरसोय; आंदोलन संपेपर्यंत कदंब बस वाहतूक बंद


20th March 2018, 01:51 am
आंतरराज्य बस वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : गोव्यातील ​खाण अवलंबित हजारोंच्या संख्येने सोमवारी राजधानी पणजीत धडकले अन्  दोन्ही मांडवी पुलांवरील वाहतूक रोखली. त्यामुळे राज्यातील अंतर्गत बस सेवा आणि अांतरराज्य बस सेवा ठप्प झाली. परिणामी प्रवाशांना जबर फटका बसला.      

रविवारी सुट्टी असल्याने राज्यातील, तसेच शेजारच्या राज्यातील नागरिक प्रवासात होते. सोमवारी ते परतले असता या आंदोलनामुळे त्यांची तारांबळ उडाली. विविध भागांतून कामासाठी राजधानीत येणारे सरकारी नोकर व इतर प्रवासी यांची गैरसोय झाली. बेळगाव, हुबळी, कारवार, फोंडा, मोले, धारबांदोडा,  भागातून येणार्‍या बसेस मेरशी सर्कलनजीक थांबवल्याने प्रवाशांना तेथून चालत पणजीत यावे लागले. महाराष्ट्र, डिचोली, साखळी, पेडणे, वाळपई भागातून येणार्‍या बसेस पर्वरी येथे अडकून राहिल्या. त्यामुळे तेथून लोकांना पणजीत चालत येण्याशिवाय मार्ग नव्हता. पणजीतील अंतर्गत वाहतूक सुरू असेल असे प्रवाशांना वाटले होते; परंतु पणजीतील अंतर्गत बससेवा ठप्प असल्याने प्रवाशांना मार्केट, मिरामार, व पणजीच्या इतर ठिकाणी चालत जावे लागले.

 वाहतुकीवर मोठा परिणाम      

 आंदोलकांनी मांडवी नदीवरील दोन्ही पुलांची दारे अडवल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.

 पणजी बसस्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पर्वरीहून पणजीच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली.   

   मेरशीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटकांनाही वाहतूक ठप्पचा प्रचंड त्रास झाला.      

 परराज्यात जाणा‌ऱ्या बसेस बसस्थानकातच अडकल्या. त्यामुळे परराज्यात जाणा‌ऱ्या प्रवाशांचे हाल झाले.       

 वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

 आंदोलन संपेपर्यंत कदंब महामंडळाची बससेवा पूर्णपणे थांबविण्यात आली होती.      

 पणजी शहरातील अंतर्गत बससेवा कोलमडल्याने पायलट, रिक्षा व्यावसायिकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले.