आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत

वाहतूक खोळंबल्याने चाकरमान्यांचे हाल : पणजीत येण्यासाठी प्रवाशांची पायपीट : पायलट, रिक्षा चालकांची मनमानी


20th March 2018, 02:49 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता                                          

पणजी : खाण अवलंबितांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे बसस्थानक प‌रिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. शहाराअंतर्गत बस वाहतूकही सुरू नसल्यामुळे पणजीत येण्यासाठी प्रवाशांची गैरसोय झाली. पायलट, रिक्षा चालक यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून आपली चांदी करून घेतली. मडगावहून येणा‌ऱ्या बस बांबोळीत, फोंड्याकडून येणा‌ऱ्या बस मेरशी सर्कल येथे, तर पेडणे, डिचोलीकडून येणा‌ऱ्या बसेस पर्वरीत थांबवल्यामुळे राजधानी गाठण्यासाठी पायपीटशिवाय पर्याय नव्हता. बस वाहतूक सुरू नसल्यामुळे अनेक प्रवाशी बसस्थानकात थांबून राहिले होते. एकूणच या आंदोलनामुळे जनजीवन पूर्णतः काेलमडून गेले.                                  

या प्रकरणी पणजी प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश विजयलक्ष्मी शिवोलकर यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी ११ खाण अवलंबितांच्या विरोधात जमावबंदी तोडून सरकारी मालमत्ता, तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची रात्री उशिरा पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने २० हजार रुपयांच्या हमीवर व इतर अटींवर सुटका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १६ मार्चपासून खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांनी पणजीत सोमवारी महामोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी सकाळी १०.३० वाजता सुमारे २००० हून अधिक खाण अवलंबित बसस्थानक नजीकच्या क्रांती सर्कल जवळ जमा झाले होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी आंदोलकांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची विनंती केली. ही विनंती धुडकावून आंदोलकांनी तेथेच वाहतूक रोखून धरली. आंदोलकांनी खाण मंत्री व आमदारांना त्या ठिकाणी दाखल होण्याची मागणी केली. ते तेथेच ठाण मांडून बसले. 

मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ; 

शिष्टमंडळाची मंत्र्यांसमवेत बैठक

दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर तेथे दाखल झाले. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयात आठ दिवसांत रिव्ह्यू याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली. यावेळी आंदोलकांनी तोंडी आश्वासनांना बळी पडणार नसल्याचे सांगितले आणि आंदोलन सुरूच ठेवले. नंतर नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, मंत्री जयेश साळगावकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दुपारी २ वाजता आंदोलकांच्या २० जणांच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांसमवेत बैठक करण्याचे ठरवले. दुपारी २.३० वाजता खाण अवलंबितांच्या शिष्टमंडळाची मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री विजय सरदेसाई, मंत्री जयेश साळगावकर व आमदार नीलेश काब्राल यांच्यासमवेत बैठक 

झाली.

रस्ता खुला करण्यासाठी पोलिसांचा लाठीहल्ला

पोलिसांनी आंदोलकांना वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. मंत्री-आमदारांनी विनंती करूनही रस्ता खुला करण्यास आंदोलकांनी नकार दिला. उलट लोकप्रतिनिधी, पोलिस यांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर बाटल्या व दगड फेकण्यात आले. आंदोलनकर्ते आक्रमक बनत असल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल लाठीमार करून दुपारी ३.३० वाजता आंदोलन नियंत्रणात आणले.                        

आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले तसेच पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी डिचोली येथील दीपक गोपाल परब (३५, कोंठबी-पाळी डिचोली), लक्ष्मीकांत सूर्या घाडी (३३, सुर्ला -पाळी डिचोली), शामबल लाडू गावस (४९, पाळी-डिचोली), प्रमोद शिरगावकर (४२, शिगाव कुळे), संदेश सुर्लाकर (२५, सुर्ला-डिचोली), जितेंद्र कुडंईकर (३९, शिरसई- बार्देझ), सदानंद नाईक (५९, शिरोडा- फोंडा), मोहनदास कामत (४५, साकोर्डा-धारबांदोडा), राजेश कामत (३७, वेळगे-डिचोली), जेम्स सावियो फ्रान्क (५२, शिरसई-बार्देश) आणि वासुदेव यादव (३९, पाली-चोली) यांच्या विरोधात भा.दं.सं. कलम १४३, १४७, ३२४, ३३२, ३५३, ३३६, ४२७, ५०४, ५०६ नुसार, तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्याचे कलम ८ (बी) आणि सार्वजनिक मालमत्ता संरक्षण कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. रात्री उशिरा पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांची सशर्त सुटका केली.   

जखमींवर गोमेकॉत उपचार

लाठीहल्ल्यावेळी मेहबूब कळीकुट्टी हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत. वासुदेव यादव, महेश नाईक आणि जेम्स फ्रान्क यांना गोमेकाॅत प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले.  दगडफेकीत अग्निशामक दलाचे चालक गोपाल शिंदे यांच्यासह महिला कॉन्स्टेबल तेजा मोरजकर, नीता आमोणकर, कॉन्स्टेबल आकाश नाईक आणि सिद्धार्थ कोरगावकर जखमी झाले. त्यांना गोमेकाॅत प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले.

वाहतूक पोलिसाची बदली                 

आंदोलनावेळी बसस्थानकाजवळील एक पंक्चर झालेले वाहन त्वरित हटवले नाही, या कारणावरून वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल शंकर गावस यांची गोवा राखीव दलात बदली करण्यात आली आहे.                   

गावस यांना पंक्चर झालेले वाहन रेगो इमारतीजवळ उभे असलेले आढळले. वाहनाचे पंक्चर काढण्याचे काम सुरू होते. पंक्चर काढल्यावर गाडी हटवा, असे त्यांनी चालकाला सांगितले. त्याचवेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी त्या परिसरात पोहोचले. त्यावेळीही पंक्चर काढण्याचे काम सुरूच होते. वाहन हटवले नसल्यामुळे त्यांनी कॉन्स्टेबल शंकर गावस यांची राखीव दलात बदली करण्याचे आदेश दिले. या आदेशाची त्वरित अंमलबजावणीही करण्यात आली. या कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहन पंक्चर होते तर त्यात कॉन्स्टेबल गावस यांचा काय दोष, असा प्रश्न एका अधिकाऱ्याने उपस्थित केला; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याने निर्देश दिल्यामुळे बदलीशिवाय पोलिसांकडे पर्याय नव्हता.

दगडफेकीत एकूण बारा वाहनांचे नुकसान

आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत अग्निशामक दलाचा बंब, पोलिस बस, कदंब महामंडळाच्या सहा बस, कर्नाटक राज्य परिवहनच्या दोन बस, सार्वजनिक बांधकाम खात्याची खासगी बोलेरो जीप यांसह एकूण १२ वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले.       लाठीहल्ल्याचा पत्रकारांनाही फटका                

खाण अवलंबितांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी दुपारनंतर हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. वार्तांकन करणारे काही पत्रकार, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफरनाही याचा त्रास सहन करावा लागला. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांच्या लाठीचा फटका सहन करावा लागला. काहींना आंदोलकांनी फेकलेल्या दगडांचा सामना करावा लागला. गोवा पोलिसांबरोबरच सीएसआयई आणि महाराष्ट्र पोलिसांची कुमकही आंदोलनस्थळी होती. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने अनेक वार्ताहर वेगवेगळ्या ठिकाणांहून वार्तांकन करत होते. तेव्हा त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले.