वाळपई पालिका मोबाईल टाॅवरना नोटीस बजावणार

मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता यांचा दुजोरा


20th March 2018, 05:04 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : नगरपालिका क्षेत्रातील वाळपई शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्तपणे सुरू असलेल्या मोबाईल कंपन्यांच्या टाॅवरना वाळपई नगरपालिकेने परवानगी दिलेली नाही. यामुळे संबंधित कंपन्यांना कायदेशीर नोटीस देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला आहे. नगरपालिकेतर्फे महसुलासंदर्भात संबंधित टाॅवरर्सना नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही नगरपालिका किंवा पंचायत क्षेत्रात मोबाईल टाॅवर उभारायचा असल्यास संबंधितांकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रमाणात कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणे गरजेचे असते. आतापर्यंत अनेक मोबाईल टाॅवर संबंधितांच्या परवानगीशिवाय उभारलेले आहेत. वाळपई नगरपालिका क्षेत्रात असलेले बहुतांश मोबाईल टाॅवरना नगरपालिकेची कोणतीही परवानगी नाही. यामुळे हे टॉवर वादात सापडले आहेत.
यासंबंधी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता म्हणाल्या, कोणत्याही मोबाईल टाॅवरला नगरपालिकेने अद्यापतरी परवानगी दिलेली नाही. काही मोबाईल टाॅवर कंपन्यांनी याबाबत नगरपालिकेशी संपर्क साधलेला नाही. यामुळे हे टाॅवर पालिकेच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. या मोबाईल टाॅवरना नगरपालिका नोटीस बजावणार आहे. यासाठी ठरावीक कालावधीत कागदपत्रे सादर करून सोपस्कार पूर्ण करण्याचे निर्देश देणार आहे. संबंधित टॉवर मालकांना ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे अाहे. यासाठी नगरपालिका त्यांना नोटीस बजावणार आहे.
पालिकेच्या नोटिसींना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी मिस्किता यांनी केले अाहे. अन्यथा मोबाईल टाॅवर बेकायदेशीर असल्याचे समजून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे वाळपई नगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेले मोबाईल टाॅवरर्स वादात सापडले आहेत. संबंधित मोबाईल टॉवरर्सवर पालिका खरोखरच कारवाई करणार का ? का कागदोपत्री घोडे नाचवून विषय सोडून देणार? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.                   

हेही वाचा